इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत रविवारी (४ मे) पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध ३७ धावांनी विजय मिळवला. धरमशाला येथे झालेल्या या सामन्यात विजय मिळवल्याने पंजाब किंग्सला दोन महत्त्वाचे पाँइंट्स मिळाले आहे. पंजाब किंग्सचा हा ११ सामन्यांतील ७ वा विजय आहे. तसेच लखनौचा मात्र ११ सामन्यांतील ५ वा पराभव आहे.
या सामन्यात लखनौ सुपर जायंट्ससमोर २३७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौला २० षटकात ७ बाद १९९ धावा करता आल्या. लखनौसाठी आयुष बडोनीने अर्धशतक करत चांगली झुंज दिली. पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. अर्शदीप सिंगने पंजाब किंग्ससाठी शानदार गोलंदाजी केली.
दरम्यान, या विजयामुळे पंजाब किंग्सला २ पाँइंट्स मिळाले असल्याने आता त्यांचे एकून १५ पाँइंट्स झाले आहेत. त्यामुळे पंजाब किंग्स आता चौथ्या स्थानावरून पाँइंट्स टेबलमध्ये गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्सला मागे टाकत दुसरा क्रमांक मिळवला आहे.
अव्वल क्रमांकावर १६ पाँइंट्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर अनुक्रमे मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स प्रत्येकी १४ गुणांसह आहेत.
रविवारी झालेल्या सामन्यात २३७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. लखनौने ५ षटकांच्या आतच मिचेल मार्श (०), एडेन मार्करम (१३) आणि निकोलस पूरन (६) हे तिन्ही फॉर्ममध्ये असलेले खेळाडू झटपट बाद झाले. या तिघांनाही अर्शदीप सिंगने बाद करत लखनौला मोठा धक्का दिला होता.
नंतर कर्णधार रिषभ पंतने आयुष बडोनीसह डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण रिषभ पंतही १८ धावा करून अझमतुल्ला ओमरझाईच्या गोलंदाजीवर शशांक सिंगकडे झेल देत बाद झाला. डेव्हिड मिलरलाही अझमतुल्लाने फार काळ टिकू दिलं नाही. त्याचाही झेल ११ धावांवर शशांक सिंगने घेतला.
पण नंतर अब्दुल सामदने बडोनीला चांगली साथ दिली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. सामदने आक्रमक खेळही केला. पण आधी विकेट्स गमावलेल्या असल्याने लखनौसाठी लक्ष्य दूर होते. तरी सामद आणि बडोनीच्या भागीदारीमुळे लखनौने १५० धावांचा टप्पा पार केला होता. पण १७ व्या षटकात सामदला ४५ धावांवर मार्को यान्सिनने त्याच्या गोलंदाजीवरच झेल घेत बाद केले. तरी बडोनी आक्रमक खेळत होता. त्याने अर्धशतकही केले.
पण तोही शेवटच्या षटकात बाद झाला. त्याने ४० चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह ७४ धावांची खेळी केली. शेवटी पंजाब किंग्सला १९९ धावांपर्यंतच पोहचला आले. आवेश खान १० चेंडूत १९ धावांवर नाबाद राहिला. प्रिन्स यादव १ धावेवर नाबाद राहिला.
पंबाजकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. अझमतुल्ला ओमरझाईने २ विकेट्स घेतल्या. मार्को यान्सिन आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पुर्वी, लखनौचा कर्णधार रिषभ पंतने नाणेफेक जिंकून पंजाब किंग्सला प्रथम फलंदाजीला पाचारण केले होते. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाब किंग्सने २० षटकात ५ बाद २३६ धावा केल्या.
पंजाब किंग्सकडून प्रभसिमरन सिंगने ४८ चेंडूत ६ चौकार आणि ७ षटकारांसह ९१ धावांची खेळी केली. तसेच कर्णधार श्रेयस अय्यरने २५ चेंडूत ४५ धावांची खेळी केली. जोश इंग्लिसने १५ चेंडूत ३० धावांची आणि शशांक सिंगने १५ चेंडूत नाबाद ३३ धावांची खेळी केली. मार्कस स्टॉयनिसने ५ चेंडूत १५ धावांची खेळी केली.
लखनौकडून आकाश सिंग आणि दिग्वेश राठी यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतली. प्रिन्स यादवने १ विकेट घेतली.