डॉ. दिलीप सातभाई - चार्टर्ड अकाउंटंट- सीए
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) प्राप्तिकर विवरणपत्र फॉर्म एक आणि चार अधिसूचना क्रमांक ४०/२०२५ द्वारे २९ एप्रिल २०२५ रोजी अधिसूचित केले आहेत. प्रत्येक करदात्याला एक एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ दरम्यान मिळालेले उत्पन्न आता अधिसूचित केलेले हे फॉर्म वापरूनच कळवावे लागणार आहे. करदात्याला त्याच्या उत्पन्नाचा स्रोत आणि स्वरूपानुसार, फॉर्म ठरवावा लागतो. प्रत्येक फॉर्मशी संबंधित पात्रता अटी आहेत, ज्या करदात्याने विवरणपत्र भरण्यास पात्र होण्यासाठी पूर्ण करणे गरजेचे आहे. कोणताही चुकीचा फॉर्म दाखल करुन अनुपालन झाले, असे म्हणता येणार नाही. त्यासाठी प्राप्तिकर विवरणपत्र-१ ‘सहज’मधील आणि विवरणपत्र-४ ‘सुगम’मधील बदल समजून घेणे आवश्यक आहे.
फॉर्म-१ ‘सहज’मधील बदलपूर्वी, विवरणपत्र एकमध्ये भांडवली नफा दर्शविण्याची तरतूद नव्हती, जी या वर्षी बदलली आहे. करदात्यास शेअर किंवा म्युच्युअल फंडांच्या विक्रीतून जास्तीत जास्त सव्वा लाख रुपयांपर्यंत कलम ११२ए अंतर्गत दीर्घकालीन भांडवली नफा झाला असेल, तर या वर्षापासून, ते उत्पन्न तो प्राप्तिकर विवरणपत्र-१मध्ये दाखल करू शकतो. तथापि, यापेक्षा भांडवली नफा अधिक झाल्यास त्यास विवरणपत्र २ दाखल करावे लागेल. या रकमेत कोणत्याही मागील वर्षांचा ओढलेला किंवा पुढे न्यायच्या तोट्याची शिल्लक रक्कम समायोजित करता कामा नये, अशी पूर्व अट आहे. करदात्याला घराच्या मालमत्तेच्या विक्रीतून भांडवली नफा झाला वा सूचीबद्ध शेअर किंवा म्युच्युअल फंडांमधून अल्पकालीन भांडवली नफा झाला असेल, तर त्याला विवरणपत्र-२ दाखल करावे लागेल. गेल्या वर्षांपर्यंत, कोणत्याही प्रकारचा भांडवली नफा मिळविलेल्या करदात्यांना प्राप्तिकर विवरणपत्र-१ भरण्यास मज्जाव होता.
‘सहज’ कोणी दाखल करावे?रहिवासी असलेले (सामान्यतः रहिवासी नसलेले सोडून) पगारदार, निवृत्ती वेतनधारक, व्याज व लाभांशाचे उत्पन्न मिळविणारे, एका घराचे उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींसाठी (गृहकर्जाच्या व्याजासह) एकूण उत्पन्न ५० लाख रुपयांपर्यंत असल्यास त्यांना ‘सहज’ विवरणपत्र दाखल करता येईल. यातील उत्पन्नात सर्वसाधारणपणे पगार, एक घर मालमत्ता, इतर स्रोतांमधून उत्पन्न (व्याज इ.) व पाच हजार रुपयांपर्यंत शेती उत्पन्नाचा समावेश होतो.
‘सुगम’मधील बदलव्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंब पद्धती आणि फर्म (एलएलपी व्यतिरिक्त) ज्यांचे एकूण उत्पन्न ५० लाख रुपयांपर्यंत आहे, अशा करदात्यांचे कलम ४४एडी, ४४एडीए किंवा ४४एई अंतर्गत गृहीत धरले जाणारे व्यापार आणि व्यवसायातून मिळणारे उत्पन्न करपात्र मानले जाते अशा करदात्यांनी हे सुगम विवरणपत्र भरणे महत्तम फायद्याचे आहे. तथापि, ज्या वैद्यकीय, अभियांत्रिकी, कायदेशीर, स्थापत्यव्यवसाय, अकाउंटन्सी व्यवसाय, तांत्रिक सल्लागार, अंतर्गत सजावट व्यवसायिकांचे ढोबळ उत्पन्न ७५ लाख रुपयांपेक्षा जास्त नाही आणि रोख स्वरूपात मिळालेली रक्कम आर्थिक वर्षातील एकूण उलाढालीच्या किंवा एकूण उत्पन्नाच्या पाच टक्क्यांपेक्षा जास्त नसेल अशा करदात्यांचेही अंतर्गत उत्पन्न गृहीत धरण्यात येते.
हे बदल प्रतिबिंबित करण्यासाठी, ‘सुगम’ प्राप्तिकर विवरणपत्र-४ मध्ये शेड्यूल बीपीअंतर्गत ‘रोख रकमेद्वारे मिळालेले उत्पन्न’ दर्शविण्यासाठी एक नवा स्तंभ समाविष्ट करण्यात आला आहे. अशा करदात्यांचा विचार या विवरणपत्रासाठी का झाला नाही, यात स्पष्टता येणे आवश्यक आहे. यंदाच्या वर्षी कलम ११२ए अंतर्गत कलम ११२ए अंतर्गत मिळणारा दीर्घकालीन भांडवली नफा सव्वा लाख रुपयांपर्यंत असल्यासही हे विवरणपत्र दाखल करता येणार आहे. छोटे व्यापारी, व्यावसायिक हे विवरणपत्र भरू शकतात.