गेल्या महिन्यात, 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील पर्यटकांवर झालेल्या नृशंस हल्ल्यामुळे फक्त भारतच नव्हे तर अख्खं जग हादरलं. 26 निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या या हल्ल्याचा सर्व स्तरांतू निषेध व्यक्त होत असून भारताने दहशतवाद्यांविरोधात कडक भूमिका घेतली आहे. दहशतवादी मुळापासून उखडून काढू, पहलगामच्या दोषींना सोडणार नाही असा निर्धार भारत सरकारकडून व्यक्त करण्यात आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दहशवाद्यांना कडक इशारा दिला आहे.
याचदरम्यान या हल्ल्याच्या निषेधार्थ विविध स्तरांतून आंदोलन करण्यात येत असून अनेक ठिकाणी बंदचेही आवाहन करण्यात आले होते. फक्त भारतातच नव्हे तर जगभरातील अनेक भागांतील लोकांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केलाय याच पार्श्वभूमीवर जर्मनीतील स्टुटगार्टमधील भारतीय समुदायाने हलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींसाठी शांततापूर्ण एकता मार्च काढला.
स्टुटगार्टमध्ये भारतीय समुदायाने वाहिली श्रद्धांजली, एकता मार्चचे आयोजन
रविवार, 4 मे 2025 रोजी, स्टुटगार्टमधील भारतीय समुदायाने, भारतीय परिवार BW च्या बॅनरखाली, भारतातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 26 निष्पाप जीवांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्लोस्प्लॅट्झ येथे शांततापूर्ण एकता मार्चचे आयोजन केले.
हा कार्यक्रम संध्याकाळी 5:00 वाजता सुरू झाला, त्यावेळी भारतीय समुदायाचे 300 हून अधिक सदस्य उपस्थित होते. हा मोर्चा सुरू होण्यापूर्वी, तेथील सहभागींनी कपाळावर टिळा लावला होता, मात्र (नेहमीप्रमाणे) तो औपचारिक स्वागताचा भाग म्हणून नव्हे तर आंतरिक श्रद्धांजली आणि सांस्कृतिक एकतेचे चिन्ह, प्रतीक म्हणून लावण्यात आला होता.
या कार्यक्रमात हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये संक्षिप्त भाषणे झाली. त्यानंतर शांती पाठ करण्यात आला आणि हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. हनुमान चालिसाचे पठण , हा या कार्यक्रमातील अतिशय संवेदनशील आणि भावनिक क्षण होता. त्यामुळे अध्यात्मिक शक्ती तर जोडली गेलीच पण उपस्थित नागरिकांमध्ये धैर्य, श्रद्धा आणि एकतेची भावना निर्माण झाली.
त्यानंतर या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांनी “हम होंगे कामयाब” (We Shall Overcome) आणि भारतीय राष्ट्रगीत एकत्रितरित्या गायले.
संध्याकाळी 5:30 च्या सुमारास एक ग्रुप फोटो काढण्यात आला, त्यानंतर सेंट्रल स्टुटगार्टमधून सुमारे 1 किलोमीटर अंतरापर्यंत शांतता मार्च काढण्यात आला.
या दुःखाच्या काळात एकता आणि राष्ट्रीय एकात्मता दाखवल्याबद्दल आयोजकांनी सर्वांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली आणि या कार्यक्रमाचा समारोप झाला.
“हिंदूंचे जीवन महत्त्वाचे आहे.” ( Hindu Lives Matter.) असा एक शक्तीशाली, महत्वाचा आणि एकजूट असलेला संदेश या शांतता मार्चद्वारे देण्यात आला. तसेच या मार्चद्वारे दहशतवादाविरोधात एक ठाम आवाज उठवण्यात आला आणि पहलगाम हल्ल्यातील मृत्यूमुखींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.