Pakistan F-16 : भारताच्या ‘या’ एका घातक अस्त्रामुळे पाकिस्तानवर आली F-16 लपवण्याची वेळ
GH News May 05, 2025 01:08 PM

उद्या भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध झाल्यास पाकिस्तानची सर्व मदार F-16 फायटर विमानांवर असणार आहे. पाकिस्तानच्या भात्यातील हे एक असं शस्त्र आहे, ज्यावर पाकिस्तान नको तितका माज दाखवतोय. युद्धात पाकिस्तानच टिकून राहणं बऱ्याच प्रमाणात F-16 विमानावर अवलंबून आहे. पाकिस्तानकडे मिसाइल्स असली, तरी पारंपारिक युद्धात F-16 हेच निर्णायक ठरु शकतं, हे पाकिस्तानला माहित आहे. 2019 साली बालाकोट एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानने याच F-16 च्या बळावर भारतात घुसण्याचं धाडस केलं होतं. पण आता भारताकडे F-16 ला ठोस उत्तर आहे. हे पाकिस्तानला चांगलं माहित आहे. म्हणून त्यांच्यावर F-16 लपवण्याची वेळ आलीय. पाकिस्तानने ही F-16 विमानं भारताच्या टप्प्यात येणार नाहीत, अशा ठिकाणी लपवण्याचा प्रयत्न केला आहे. भारताच्या कुठल्या शस्त्रामुळे पाकिस्तानवर F-16 फायटर जेट्स लवपण्याची वेळ आलीय, ते जाणून घेऊया.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत गप्प बसणार नाही, हे पाकिस्तानी राज्यकर्त्यांना माहित आहे. भारताकडून प्रत्युत्तराची कारवाई होईल या भितीने पाकिस्तानने त्यांची F-16 विमान ग्वादर येथे हलवली आहेत. भारताकडे आता S-400 एअर डिफेन्स सिस्टिम आहे. सध्याच्या घडीला जगातील ही एक मजबूत एअर डिफेन्स सिस्टिम मानली जाते. अमेरिकेला सुद्धा या S-400 च भय आहे. म्हणून S-400 विकत घेणाऱ्या देशांवर अमेरिकेकडून प्रतिबंधाची कारवाई केली जाते. म्हणा, भारताच्या बाबतीत अशी प्रतिबंधाची कारवाई करण्याची हिम्मत अमेरिकेने दाखवलेली नाही. रशियन बनावटीच्या S-400 मिसाइल सिस्टिमद्वारे भारत F-16 विमानांचा ठावठिकाणा शोधून काढेल ही भिती पाकिस्तानला आहे. त्यामुळे F-16 विमानांची जागा बदलण्यामागे त्यांची भिती आणि रणनिती या दोन्ही गोष्टी आहेत.

त्याशिवाय पाकिस्तानला अजून एक भिती

भारताविरुद्ध F-16 वापरली, तर अमेरिका नाराज होईल ही भिती सुद्धा पाकिस्तानला आहे. कारण दहशतवाद विरुद्ध मिशन्ससाठीच अमेरिकेने ही फायटर जेट्स पाकिस्तानला दिलेली आहेत. 2019 साली बालकोट एअर स्ट्राइकनंतर F-16 विमानं भारताविरुद्ध वापरण्यात आली होती. त्यावेळी भारताने हा मुद्दा अमेरिकेकडे उपस्थित केला होता. शिवाय अभिनंदन वर्थमान यांच्याकडे असलेल्या रशियन बनावटीच्या मिग-21 बायसन विमानाने एक F-16 विमान पाडलं होतं. त्यामुळे पाकिस्तानने चिनी बनावटीची JF-17 फायटरं विमानं भारताजवळच्या सीमेवर तैनात केली आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.