Latur Division Wise Board Result Maharashtra Class 12: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज 5 मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. राज्यभरातील 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यंदाचा बारावीचा निकाल 91.88 टक्के इतका लागला आहे. गेल्या वर्षापेक्षा यंदाचा निकाल हा 1.49 टक्क्यांनी कमी झाला आहे. नऊ विभागीय मंडळातून नेहमीप्रमाणे कोकण विभागाचा निकाल 96.74 टक्के इतका सर्वाधिक असून सर्वांत कमी निकाल लातूर विभागाचा 89.46 टक्के इतका आहे. 2024 मध्येही कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.51 टक्के लागला होता. तर मुंबई विभागात सर्वांत कमी 91.95 टक्के विद्यार्थी पास झाले होते.
सर्व विभागीय मंडळातून नेहमीच मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी 94.58 टक्के असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 89.51 टक्के इतकी आहे. म्हणजेच नेहमीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली आहे. मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ही मुलांपेक्षा 5.07 टक्क्यांनी अधिक आहे. बारावीत एकूण 154 विषयांची परीक्षा घेण्यात आली होती. त्यापैकी 37 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. खेळाडू, एनसीसी, स्काऊट गाइडच्या विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार सवलतीचे वाढीव गुण देण्यात आले आहेत.
यंदा बारावी-दहावीच्या परीक्षा दहा दिवस लवकर घेण्यात आल्या होत्या. तसंच 15 मे पूर्वी दोन्ही परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचं राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आलं होतं. त्यामुळे बारावीचा निकाल कधी जाहीर होणार याकडे पालक आणि विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं होतं.
जून-जुलै 2025 मध्ये आयोजिक करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार आणि खासगी विद्यार्थ्यांसाठी 7 मेपासून मंडळाच्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात येणा आहे. उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची कॉपी घेणं अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीद्वारे संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करणं आवश्यक आहे.