Jayakumar Gore: स्थगिती उठविल्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका: ग्रामविकासमंत्री गोरे, स्थगितीच काय कारणं?
esakal May 05, 2025 05:45 PM

कऱ्हाड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तत्काळ व्हाव्यात, तेथे काम करणाऱ्यांना संधी मिळून लोकशाही बळकट व्हावी, ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही इच्छा आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी तज्ज्ञ वकिलांच्या नेमणुका केल्या आहेत. तत्काळ निकाल होण्याच्या दृष्टीने ते भूमिका मांडतील. न्यायालयाने स्थगिती उठविल्यावर निवडणुका लागतील, असे मत ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले. 


येथील शासकीय विश्रामगृहात मंत्री गोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. महाबळेश्वर महापर्यटन उत्सवाकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार नितीन पाटील, आमदार दीपक पाटील यांनी पाठ फिरवली? यावरती ते म्हणाले, ‘‘हा पर्यटन विभागाचा कार्यक्रम आहे. आपल्या नियोजित कामांमुळे काहीजण येऊ शकले नसतील. उद्या मुख्यमंत्री त्याठिकाणी आहेत. आम्ही सगळे कार्यक्रमाला असणार आहोत. सगळे तिथे उपस्थित राहतील. याचा कोणी चुकीचा अर्थ काढू नये. महायुती मजबूत आहे, प्रत्येकाच्या घरात छोटी-मोठी भांडणे होत असतात, त्यात काही वेगळे नाही.’’


जिल्ह्यात ग्रामविकासामध्ये कमी काम झाले आहे? या प्रश्नावर ते म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसांचा आदर्शवत कार्यक्रम राबवला. प्रत्येक विभाग, मंत्र्यांना शंभर दिवसांची उद्दिष्टे ठरवून दिली. त्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने आपण चांगले काम केले. याचा आढावाही ते घेत असतात. त्यांच्या पाठपुरावामुळे शंभर दिवसांत महाराष्ट्र खूप वेगाने पुढे गेला आहे. यामध्ये काम करताना काही गोष्टी कमी-जास्त झाल्या असतील. मंत्री, विभागांकडून कसे काम करून घ्यायचे, हे देवेंद्र फडणवीस यांनी या माध्यमातून दाखवून दिले आहे.’’ 

आषाढी वारीच्या नियोजनाची आढावा बैठक घेतली आहे. हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव आहे. लाखो भाविक पायी चालत येतात. त्यांच्या सोयीसुविधांबाबत वेगळे काय करता येईल, यादृष्टीने चर्चा सुरू आहे. गतवर्षीच्या उणिवा भरून काढल्या जातील. पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी वारकरी सेवा भवन उभारण्याबाबत चर्चा सुरू आहे. त्यामध्ये दुखापतग्रस्त वारकऱ्यांवर उपचार व त्यांच्या पायांना मसाज करणे आदी सुविधा देण्यात येतील. याबाबत अतुल भोसलेंना जास्त माहिती आहे. त्यांनी पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीवर काम केले आहे. प्रयागराजच्या धर्तीवर काय सुविधा देता येतील, याचा विचार सुरू आहे, असेही मंत्री गोरे यांनी सांगितले.

कर्तृत्ववान जिल्हाध्यक्ष मिळेल...

भारतीय जनता पक्षाचा सातारा जिल्हाध्यक्ष निवडीसंदर्भात स्थानिक पातळीवरून मी, आमदार अतुल भोसले व अन्य जणांकडून बंद पाकिटातून निरीक्षकांनी माहिती घेतली आहे. लवकरच प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्र्यांकडे ते सादर करतील. यावर ते योग्य निर्णय घेतील. त्यामुळे जिल्ह्याला खूप चांगला आणि कर्तृत्ववान जिल्हाध्यक्ष मिळेल, असा विश्वास मंत्री गोरे यांनी व्यक्त केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.