Dividend Stocks : आयटी कंपनी देणार १९ रुपयांचा लाभांश, स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड तारीखही निश्चित
मुंबई : संगणक सॉफ्टवेअर आणि सल्लागार कंपनी कॉफोर्ज लिमिटेडने ५ मे २०२५ रोजी चौथ्या तिमाहीचे आणि पूर्ण आर्थिक वर्ष २०२४-२५ चे निकाल जाहीर केले आहेत. निकालांसह कंपनीने आपल्या भागधारकांसाठी १९०% लाभांश जाहीर केला आहे. म्हणजे प्रत्येक शेअरवर १९ रुपये लाभांश दिला जाईल. कंपनीने या लाभांशासाठी १२ मे २०२५ ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे.
निव्वळ नफाकॉफोर्जचा निव्वळ एकत्रित नफा जानेवारी-मार्च २०२५ या तिमाहीत वार्षिक आधारावर ३४ टक्क्यांनी वाढून ३०७.३ कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षी २२९.२ कोटी रुपये नफा झाला होता. कंपनीच्या मालकांना मिळालेला नफा २६१.२ कोटी रुपये झाला, जो मार्च २०२४ च्या तिमाहीत २२३.७ कोटी रुपयांवरून जवळपास १७ टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीच्या कामकाजातून मिळणारा एकत्रित महसूल वर्षानुवर्षे ४७ टक्क्यांनी वाढून ३४०९.९० कोटी रुपये झाला. एक वर्षापूर्वी हा आकडा २३१८.४ कोटी रुपये होता.
आर्थिक वर्षातील नफासंपूर्ण आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये कॉफोर्जच्या कामकाजातून एकत्रित महसूल १२०५०.७ कोटी रुपये नोंदवला गेला, जो गेल्या वर्षी ९००८.९ कोटी रुपये होता. निव्वळ एकत्रित नफा आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ८३५.६ कोटी रुपयांच्या तुलनेत ९३६.१ कोटी रुपये झाला. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीच्या मालकांना ८१२.१ कोटी रुपये नफा झाला.
स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड तारीख जाहीरकोफोर्ज स्टॉक स्प्लिट देखील करणार आहे. याची रेकॉर्ड तारीख ४ जून २०२५ आहे. १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या कंपनीच्या १ शेअरचे ५ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या २ इक्विटी शेअर्समध्ये विभाजन केले जाईल. यापूर्वी, कंपनीने जानेवारी २०२५ मध्ये प्रति शेअर १९ रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला होता. कोफोर्जने जानेवारी २०२३ ते मे २०२५ पर्यंत १० वेळा १९ रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.
शेअर्सचा परतावा५ मे रोजी १.५ टक्क्यांच्या वाढीसह ७४९९.१० रुपयांवर बंद झाले. कंपनीचे मार्केट कॅप ५०१०० कोटी रुपये आहे. गेल्या एका वर्षात या शेअरमध्ये ६७ टक्के आणि २ आठवड्यात ८ टक्के वाढ झाली आहे. तर २०२५ मध्ये त्यात २२ टक्क्यांनी घट झाली आहे. कंपनीमध्ये सार्वजनिक भागधारकांचा १०० टक्के हिस्सा आहे.