महाड, ता. ६ (बातमीदार) : कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईनंतर राज्य सरकारने आता सर्व गड-किल्ले अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावरही कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. यामुळे रायगडावर वर्षानुवर्षे व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येणार आहे.
रायगड किल्ल्यावर २४ निवासी घरे आणि ५६ दुकाने अतिक्रमण म्हणून घोषित करून वन विभागाने त्यांना ३० मे २०२५ पर्यंत जागा रिकाम्या करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. या कारवाईला पुरातत्त्व विभागाचा पाठिंबा आहे. या अतिक्रमणांमध्ये धनगर समाजाची घरे, झुणका-भाकर केंद्र, स्टॉल्स, खाद्यपदार्थ व पाणी बाटली विक्रेते यांचा समावेश आहे. यातील अनेक जण महादरवाजापासून जगदीश्वर मंदिरापर्यंत पायवाटांवर आपला लहान-मोठा व्यवसाय करत आहेत. या व्यवसायांना आणि घरांना अनधिकृत ठरवून वन विभागाने स्वखर्चाने अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात २५ एप्रिलला महाड येथील वन विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती.
अतिक्रमण हटाव मोहीम
रायगड राखीव वन क्षेत्र क्रमांक ५५० मधील अतिक्रमण कच्च्या स्वरूपाचे असल्याचे निरीक्षणात आले असून, तत्काळ हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रायगडावर महादरवाजा ते चित्त दरवाजापर्यंत ३१ लहान स्टॉलधारक आहेत. हत्ती तलाव ते महादरवाजापर्यंत सात स्टॉलधारक आहेत. बाजारपेठ ते समाधी स्थळापर्यंत १६ स्टॉलधारक आहेत. जगदीश्वर मंदिराजवळ आठ घरे आहेत, तर मदारी मोर्चाजवळ दोन घरे आहेत व वाळसुरे खिंडीमध्ये एक घर आहे. या सर्वांना या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका बसणार आहे. याबाबत महाड वन विभागाची संपर्क साधला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
.....