पंकज रोडेकर ः सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ ः ‘झाडे लावा आणि झाडे जगवा’ या संदेशातून एकीकडे दरवर्षी प्रशासनाकडून पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती केली जात आहे, तर दुसरीकडे ठाणे शहरात वर्षभरात झाडे उन्मळून पडण्याच्या ११५ घटनांची नोंद झाली आहे, तर २०२५ मधील पहिल्या चार महिन्यांत तब्बल ५८ झाडे उन्मळून पडली असून, तब्बल २० वाहनांचे आणि तीन घरांचे नुकसान झाल्याने पर्यावरण संवर्धनालाच हरताळ फासल्याचे चित्र आहे.
पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे किंवा अन्य नैसर्गिक कारणांमुळे झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडतात. या प्रकारांमुळे कधी जीविताला, तर कधी मालमत्तांचे मोठे नुकसान होते. याच पार्श्वभूमीवर संभाव्य धोके टाळण्यासाठी मार्चमध्येच धोकादायक फांद्या काढण्याच्या मोहिमेला ठाणे महापालिकेने सुरुवात केली आहे. धोकादायक झाडांच्या फांद्या छाटणीचे काम सुरू असताना, ठाणे शहरात तब्बल ११५ ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याचे प्रकार घडले आहेत. यामध्ये मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यातच तब्बल ७५ दोन्ही अशा प्रकारच्या घटनांची नोंद झालेली आहे. त्यात एप्रिलमधील ५२ घटनांचा समावेश आहे. त्यामुळे एकीकडे वृक्षसंवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत, तर दुसरीकडे दुर्लक्षामुळे झाडे पडण्याच्या घटना वाढल्या आहेत.
------------------------
वाहन, घरांचे नुकसान
२०२५ कोसळलेल्या झाडांमुळे २० वाहनांचे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या अधिक आहे. एप्रिलमध्ये तब्बल नऊ दुचाकींचे नुकसान झाले आहे, तर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये प्रत्येकी दोन तसेच एप्रिलमध्ये चार चारचाकींचे झाडे पडल्याने नुकसान झाले आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कोसळलेल्या झाडांखाली रिक्षांचे नुकसान झाले आहे, तर घरावर झाड पडल्याने पत्रे फुटल्याच्या तक्रारी आपत्ती व्यवस्थापन कक्षेत नोंदवल्या गेल्या आहेत.
----------------------------------------
२०२५ पडलेली झाडे फांद्या
जानेवारी - ८ १०
फेब्रुवारी - ११ ११
मार्च - १२ ११
एप्रिल - २७ २५
एकूण - ५८ ५७