- निखिल रोकडे
नाशिक - नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये विक्रमी नोटांची छपाई करण्यात आली आहे. पहिल्यांदाच २०२४- २५ मध्ये सात हजार मिलियन म्हणजेच ७०० कोटी नग नोटांची छपाई करण्यात आली आहे. यापूर्वी २०२३-२४ मध्ये ५३० कोटी नोटांची छपाई करण्यात आली होती. नोट बंदीच्या काळातही ६०० कोटी नोटा छापण्यात आल्या होत्या.
नोट प्रेसमध्ये सध्या अधिकारी, कामगार व सुरक्षा रक्षक असे दीड हजार जण कार्यरत आहेत. सकाळी सात व सायंकाळी पाच या दोन सत्रांमध्ये कामकाज चालते. दहा रुपयाच्या नोटां व्यतिरिक्त सर्व नोटा येथे छापल्या जातात.
आयएसपी इंडिया सिक्युरिटी प्रेसमधून आयएसपी व सीएनपी करन्सी नोट प्रेस हे दोन प्रेस स्वतंत्र येथे आहेत. या व्यतिरिक्त भारतात देवास (मध्य प्रदेश), म्हैसूर कर्नाटक सालबोनी (पश्चिम बंगाल) येथे नोटांची छपाई केली जाते.
नोटांच्या छपाईसाठीचे निकष
महागाई दर, आर्थिक वाढ, डिजिटल करन्सीचे प्रमाण, रोख रकमेची मागणी व गरज, चलनातून बाद झालेल्या नोटा, बाजाराची स्थिती, खराब नोटा या बाबींचा आढावा घेऊन नोटा छापल्या जातात.
‘आयएसपी’मध्ये
पासपोर्ट, मिलिटरी वॉरंट, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, भारतीय रिझर्व्ह बँकेचे धनादेश यांची छपाई केली जाते.
‘सीएनपी’मध्ये
फक्त चलनी नोटा छापल्या जातात.
नोटबंदीनंतर संघटनेने आधुनिकीकरण व तंत्रज्ञानासाठी पाठपुराव्याला यश मिळाले. या माध्यमातून नवीन यंत्रसामुग्री उपलब्ध झाली. व्यवस्थापन व कामगार यांच्या योग्य समन्वयातून नोटांचे विक्रमी उत्पादन यशस्वीपणे करता आले.
- जगदीश गोडसे, सरचिटणीस, आयएसपी व सीएनपी प्रेस