वॉशिंग्टन- मॉस्को : भारताने पाकिस्तानसह पाकव्याप्त काश्मिरातील नऊ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याच्या पार्श्वभूमीवर भारत व पाकिस्तानने संयम राखावा, दोन्ही देशांतील शत्रुत्व लवकरच संपेल, अशी अपेक्षा संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस ॲंटोनिओ गुटेरस व अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी व्यक्त केली.
भारत व पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष जगाला परवडणारा नाही. त्यामुळे दोन्ही देशांनी जास्तीत जास्त लष्करी संयम पाळावा, असे आवाहन गुटेरस यांनी केले. आंतरराष्ट्रीय सीमा आणि प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडत भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईमुळे गुटेरस चिंतित आहेत, असेही गुटेरस यांचे प्रवक्ते स्टिफन डुजारिक यांनी सांगितले. दोन्ही देशांतील शत्रुत्व लवकरच संपेल, अशी आशा डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, की हे खूप लाजिरवाणे आहे. भूतकाळातील अनुभवावरून अशा प्रकारचा हल्ला घडणार आहे, याचा लोकांना अंदाज होता. ते (भारत-पाकिस्तान) दीर्घकाळापासून एकमेकांशी संघर्ष करत आहेत. जर तुम्ही खरोखरच विचार केला तर त्यांच्यात अनेक दशकांपासून, शतकांपासून संघर्ष आहे. हे लवकरात लवकर संपेल, अशी मला आशा आहे. भारत व पाकिस्तानमधील परिस्थितीवर जवळून लक्ष ठेवून आहोत, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी सांगितले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत व पाकिस्तानमधील लष्करी तणाव वाढत असल्याबद्दल रशियानेही चिंता व्यक्त केली आहे.
संयम बाळगण्याचे चीनचे आवाहनशांतता व स्थिरतेच्या व्यापक दृष्टिकोनातून भारत आणि पाकिस्तानने जास्तीत जास्त संयम बाळगावा, असे आवाहन चीनने a आहे. आंतरराष्ट्रीय समुदायासोबत काम करून तणाव कमी करण्यात आम्ही विधायक भूमिका बजावू, असेही चीनने स्पष्ट केले. सध्याच्या परिस्थितीमुळे आम्ही चिंतित आाहेत. भारत व पाकिस्तान एकमेकांचे शेजारी आहेत व राहतील. ते चीनचेही शेजारी आहेत. चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करतो. दोन्ही बाजूंनी परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होईल, अशी पावले उचलणे टाळावे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
भारत व पाकिस्तानमधील लष्कराचा तणाव सातत्याने वाढत असल्याने आम्ही अतिशय चिंतेत आहोत. संबंधित प्रदेशातील परिस्थिती आणखी बिघडू नये म्हणून आम्ही संबंधित पक्षांना संयम बाळगण्याचे आवाहन करतो. दोन्ही देश सिमला करार तसेच लाहोर घोषणापत्रातील तरतुदींच्या आधारे शांततामय, राजकीय व राजनैतिक मार्गाने मतभेद दूर करतील, अशी आशा आहे.
- मारिया झाखारोव्हा, परराष्ट्र मंत्रालय प्रवक्त्या, रशिया
भारत आणि पाकिस्तानने संयम बाळगावा. दक्षिण आशियातील स्थिरता मजबूत करण्यासाठी आणि पुढील प्रादेशिक तणाव टाळण्यासाठी संवाद आणि परस्पर समंजसपणाचे आवाहन करणाऱ्या आवाजांकडे लक्ष देण्यात यावे. शांतता, स्थिरतेसाठी संवाद व मुत्सद्देगिरी सर्वाधिक महत्त्वाची आहे.
- शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नाहयान, उपपंतप्रधान, यूएई
भारत व पाकिस्तानमध्ये प्रत्युत्तरादाखल केल्या जाणाऱ्या कारवाया आणखी लष्करी तणाव वाढवू शकतात, याची आम्हाला सर्वाधिक काळजी आहे. दक्षिण आशियातील शांतता व स्थिरतेसाठी या देशांनी संयम ठेवत चर्चेतून प्रश्न सोडवावेत.
- योशिमासा हयाशी, मंत्रिमंडळ सचिव, जपान