India Pakistan War: डोभाल पंतप्रधानांच्या भेटीला, संरक्षण मंत्री तीनही लष्करी प्रमुखांसोबत बैठकीत, अमेरिकेला फिरवला फोन
esakal May 09, 2025 08:45 AM

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठका आणि चर्चांना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी महत्त्वपूर्ण चर्चा केली. या भेटीत देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आणि पाकिस्तानच्या हालचालींचा आढावा घेण्यात आला.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत सीमा सुरक्षा आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी असलेल्या तयारीवर मंथन झाले. लष्कराच्या तिन्ही शाखांना सतर्क राहण्याचे आणि समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अमेरिकेशी राजनैतिक चर्चा; दहशतवादावर भारताला पाठिंबा

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. जयशंकर यांनी भारतावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या संदर्भात अमेरिकेने दाखवलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच, भारताच्या भूमिकेबद्दल स्पष्टता देताना जयशंकर म्हणाले की, पाकिस्तानकडून होणाऱ्या कोणत्याही चिथावणीखोर कृतीला भारत सडेतोड उत्तर देईल.

भारतीय सुरक्षा दलांची प्रभावी कामगिरी; ड्रोन हल्ले हाणून पाडले

पाकिस्तानने जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर येथील भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने त्वरित आणि प्रभावी कारवाई करत त्यांचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले यशस्वीरित्या विफल केले. भारताच्या मानक कार्यप्रणालीनुसार (SOP) आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक पद्धतींचा वापर करून शत्रूच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. या हल्ल्यांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले नाही.

S-400 ची ताकद; सीमाभागात हाय अलर्ट

भारताच्या हवाई संरक्षणाची ताकद वाढवणारी रशियाची S-400 ही संरक्षण प्रणाली अत्यंत प्रभावी ठरली आहे. याच प्रणालीमुळे पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांना हवेतच नष्ट करणे शक्य झाले. नियंत्रण रेषा (LOC) आणि इतर सीमावर्ती भागांमध्ये भारतीय लष्कर पूर्णपणे तयारीत असून, शत्रूच्या कोणत्याही हालचालीला तत्काळ आणि योग्य प्रतिसाद देण्यासाठी सज्ज आहे.

सोशल मीडियावर कठोर कारवाई; हजारो खाती बंद करण्याचे आदेश

भारत सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वरून 8000 हून अधिक खाती हटवण्याचे निर्देश दिले आहेत. या खात्यांवर चुकीच्या बातम्या, देशविरोधी मजकूर आणि अपप्रचार पसरवण्याचा आरोप आहे. X च्या जागतिक प्रशासकीय विभागाने या संदर्भात माहिती दिली असून, भारतातील काही आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक वापरकर्त्यांची खाती ब्लॉक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.