पाकिस्तान हे दहशतवाद्यांचं आश्रयस्थान आहे हे आता संपूर्ण जगाला माहिती झालं आहे. पहलगाम हल्ल्यातही पाकिस्तानात आश्रय घेतलेल्या दहशतवाद्यांचा हात असल्याचं स्पष्ट झालं आहे. यासाठी भारताने बुधवारी रात्री दहशतवाद्यांच्या 9 तळं उद्ध्वस्त केली होती. मात्र यानंतर दहशतवाद पुरस्कृत पाकिस्तान सरकारने भारतावर हल्ला करण्याचं दुष्कृत्य केलं. भारताने प्रत्येक हल्ल्याचं त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं. भारताचं रौद्र रूप पाहून आता पाकिस्तानला पळता भुई थोडी झाली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डही धास्तावला आहे. त्यामुळे पाकिस्तान सुपर लीगचे उर्वरित सामने इतर देशात शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरित सामने आता पाकिस्तान ऐवजी दुबईत होणार आहेत. विदेशी खेळाडूंच्या सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला आहे. या लीग स्पर्धेत एकूण 8 सामने शिल्लक आहेत. हे सामने रावलपिंडी, मुल्तान आणि लाहोरमध्ये होणार होते. पण या तिन्ही शहरांवर भारताने हल्लाबोल केला आहे. त्यामुळे पीसीबीने पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा दुबईला शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताने प्रतिहल्ला करत रावलपिंडी क्रिकेट स्टेडियम उद्ध्वस्त केलं होतं. यामुळे 8 मे रोजी कराची किंग्स आणि पेशावर जाल्मी यांच्यात होणारा सामना रद्द करण्यात आला होता. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सर्व सामने कराचीत करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान पाकिस्तानकडून गुरुवारी रात्री भारताच्या अनेक शहरांना लक्ष्य केलं गेलं. त्यामुळे भारताने प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या अनेक शहरांवर हल्ला चढवला. यात लाहोर आणि कराची या शहरांचाही समावेश होता.
पाकिस्तानचा दहशतवाद आणि त्यांची रणनिती पाहून पीएसएल खेळणारे विदेशी खेळाडू घाबरले आहेत. अशा स्थितीत मायदेशी परतण्याचा निर्णय अनेक खेळाडूंनी घेतला आहे. पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नकवीने सांगितलं की, त्यांच्यासाठी खेळाडूंची सुरक्षा महत्त्वाची आहे. पीसीबीने पीएसएल देशाबाहेर दुबईत करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्यात पीएसएल स्पर्धा रद्द झाली तर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड भिकेला लागेल. त्यामुळेच हा निर्णय घेतला गेला आहे. पाकिस्तानला विदेशी खेळाडूंची चिंता असती तर असे भ्याड हल्ले केले नसते. दुसरीकडे, भारताने प्रत्येक हल्ल्याचं प्रत्युत्तर दिलं जाईल असं सांगितलं आहे.