Yashavi Jaiswal : मी तु्म्हाला विनंती करतो, महिन्याभराआधी माज दाखवणाऱ्या यशस्वीवर हात जोडण्याची वेळ!
GH News May 09, 2025 08:09 PM

भारत पाकिस्तान यांच्याचील तणावामुळे आयपीएलच्या 18 व्या मोसमातील उर्वरित 16 सामने स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयकडून घेण्यात आला आहे. आयपीएलकडून याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती देण्यात आली. आयपीएलच्या या अधिकृत निर्णयाआधी टीम इंडियाचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल याने मोठा यू-टर्न घेतला आहे. यशस्वीने त्याचा निर्णय अवघ्या काही दिवसांमध्येच बदलला आहे. यशस्वीने आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडूनच खेळत राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यशस्वीने यासाठी एमसीए अर्थात मुंबई असोसिएशनला मेल केला आहे. यशस्वी आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधित्व करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यशस्वीने एमसीएकडे गोव्याकडून खेळण्यासाठी देण्यात येणारं ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मागे घेण्यात यावं, अशी विनंती मेलद्वारे केली आहे. यशस्वी आगामी हंगामात मुंबईकडून खेळण्यासाठी तयार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

यशस्वीने मेलमध्ये नक्की काय म्हटलंय?

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, यशस्वीने केलेल्या इमेलवर मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. “माझ्या कुटुंबाचा गोव्यात शिफ्ट होण्याचा आता कोणताही विचार नाही. त्यामुळे आपण मला दिलेलं ना हरकत प्रमाणपत्र मागे घेण्यात यावं, अशी तुम्हाला विनंती करतो. मला या हंगामात मुंबईकडून खेळायचे आहे. मी गोवा क्रिकेट बोर्ड किंवा बीसीसीआयला ना हरकत प्रमाणपत्र दिलेलं नाही”, असं यशस्वीने एमसीएला केलेल्या मेलमध्ये म्हटलं आहे.

यशस्वी गेली अनेक वर्ष देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करतोय. मात्र यशस्वीने मध्यंतरी गोव्याकडून खेळण्याचं ठरवलं . त्यामुळे यशस्वीने एमसीएकडे ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. नियमांनुसार, एखाद्या खेळाडूला इच्छूक संघाकडून खेळायचं असेल तर त्याला सध्याच्या टीमकडून देण्यात येणार ना हरकत प्रमाणपत्र द्यावं लागतं. त्यासाठीच यशस्वीने एमसीएकडे अर्ज केला होता. मात्र आता यशस्वीने तो निर्णय बदलला आहे.

यशस्वी गोव्याकडून खेळण्यासाठी इच्छूक असल्याचं वृत्त एप्रिल महिन्यात समोर आलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यशस्वीने तेव्हा गोव्याकडून खेळणार असल्याचं एमसीएला कळवलं होतं. यशस्वीने तेव्हा गोव्याकडून खेळण्याच्या निर्णयामागे कौटुंबिक कारणाचा दाखला दिला होता.

“गोवा क्रिकेट बोर्डाकडून मला कर्णधारपदाची ऑफर देण्यात आली. देशासाठी चांगली कामगिरी करणं हे माझं प्रथम प्राधान्य आहे. मात्र मी जेव्हा देशासाठी खेळत नसेन तेव्हा गोव्यासाठी खेळेन. गोवा टीमला देशांतर्गत स्पर्धेत शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करेन. मला गोव्याकडून ही संधी मिळाली. त्यामुळे मी ही संधी स्वीकारली”, असं यशस्वीने इंडियन एक्सप्रेससह बोलताना म्हटलं होतं.

कर्णधार रहाणेसह पंगा!

दरम्यान यशस्वीने मुंबई क्रिकेट टीमचा कर्णधार अजिंक्य रहाणे याच्यासह पंगा घेतल्याचा दावाही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. मीडिया रिपोर्ट्नुसार, यशस्वी एका सामन्यात प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूला डिवचत होता. त्यामुळे रहाणेने यशस्वीला संभाव्य कारवाई लक्षात घेत बचावण्यासाठी मैदानाबाहेर पाठवलं होतं. यशस्वीने याच रागातून रहाणेच्या क्रिकेट कीटला लाथ मारली होती. त्यानंतर यशस्वीने गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता काही दिवसांतच यशस्वीची मस्ती जिरली. माज दाखवणाऱ्या यशस्वीवर आता विनंतीची भाषा करण्याची वेळ ओढावलीय. आता या प्रकणात एमसीएच्या भूमिकेकडे क्रिकेट वर्तुळाचं लक्ष असणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.