मुंबई : राज्यात सध्या अधिकृतपणे 40 हजार स्कूल बसेस रस्त्यावर धावत असून दुसरीकडे सुमारे 50 ते 60 हजार बसेस अनधिकृतपणे धोकादायक पद्धतीने शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करीत असल्याची धक्कदायक माहिती आज (08 मे) परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेल्या बैठकीत समोर आली. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत तक्रार केली आहे. या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाला प्राधान्य देत लवकरच स्कूल बसेसच्या नियमावलीत सुधारणा करणार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले. तसेच शालेय विद्यार्थ्यांची अनधिकृतपणे वाहतूक करणाऱ्या बसेसवर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले. (Pratap Sarnaik informs that 60 thousand unauthorized buses are transporting school students)
प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज यशवंतराव चव्हाण सभागृह येथे स्कूल बस असोसिएशन आणि पालक असोसिएशन यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत बोलताना सरनाईक यांनी स्कूल बसमधून शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखावह झाला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या जीविताशी कोणीही खेळू नये. त्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
हेही वाचा – Maharashtra : कर महसूल वाटप 50 टक्क्यांपर्यंत वाढवा; राज्याची 16व्या वित्त आयोगाकडे मागणी
अनधिकृतपणे विद्यार्थ्यांची ने-आण करताना कारवाई केलेल्या स्कूल बसेसना पुढील तीन महिन्यात दंडात्मक रक्कम भरून त्या बसेस अधिकृत करून घेण्याची संधी सरनाईक यांनी बस मालकांना या बैठकीत दिली. मात्र, 3 महिन्यानंतर ज्या प्रादेशिक परिवहन विभागांमध्ये अशा प्रकारच्या अनधिकृत स्कूल बसेस आढळल्यास संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनाही कठोर कारवाईला समोर जावे लागणार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.
परिवहन विभागानेही विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाला प्राधान्य दिले असून यासाठी स्कूल बसेसच्या नियमावलीत आवश्यक सुधारणा केल्या जातील. वाहन चालकांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. नियमावलीत सुधारणा करताना वाहनचालक आणि पालक संघटनांच्या भावना आणि अडचणींचाही विचार केला जाईल. कोणावर अन्याय होणार नाही. पण नियमही शिथिल होणार नाहीत, असे सरनाईक यावेळी म्हणाले. या बैठकीस परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर स्कूल बस धोरण करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. या धोरणातील त्रुटी दूर केल्या जातील. आजच्या बैठकीत स्कूल बस असोसिएशन आणि पालक असोसिएशन यांनी मांडलेल्या सूचनांचा धोरणातील नियम सुधारणावेळी विचार केला जाईल, असे आश्वासन परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी यावेळी दिले. बैठकीला परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.
हेही वाचा – Sharad Pawar : पक्षातल्या एका गटाला वाटतंय की…; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत पवारांचं वक्तव्य चर्चेत