Indian Army Recruitment: भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? ₹1.2 लाख पगाराची मोठी भरती; अर्जाची शेवटची तारीख जाणून घ्या
esakal May 09, 2025 08:45 PM

Indian Army Recruitment For Short Service Commission: ऑपरेशन सिंदूरनंतर भारत पाकिस्तानातील तणाव वाढतच जात आहे. देशभरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक नागरिकाला देशासाठी काहीतरी करण्याची प्रबळ इच्छा होत आहे.

अशातच देशसेवा, सन्मान आणि सुरक्षित भविष्य या सगळ्यांचे स्वप्न पाहणाऱ्या युवक-युवतींसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. भारतीय सैन्याच्या रिमाउंट अॅण्ड व्हेटनरी कोअर (RVC) मध्ये शॉर्ट सर्विस कमिशन (SSC) अंतर्गत अधिकारी पदासाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीतून निवड झालेल्या उमेदवारांना कॅप्टन पद दिलं जाईल आणि त्यांना सैन्यदलाचा एक मानाचा भाग बनण्याची संधी मिळेल.

या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी 26 मे 2025 पर्यंत अर्ज पाठवायचा आहे. इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन म्हणजे पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. विशेष म्हणजे ही भरती पुरुष आणि महिला दोघांसाठी खुली असून, व्हेटनरी सायन्समध्ये पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. एवढेच नव्हे तर महिन्याला 80 हजार ते 1.2 लाख रुपये इतका आकर्षक पगारही मिळणार आहे. तुम्हाला देखील यासाठी अर्ज करायचा असेल तर पुढील सविस्तर माहिती नक्की वाचा.

भरतीसाठी रिक्त जागा

- पुरुष उमेदवारांसाठी – 17 जागा

- महिला उमेदवारांसाठी – 3 जागा

पात्रता

- उमेदवाराने व्हेटनरी सायन्समध्ये पदवी (B.V.Sc किंवा B.V.Sc & AH) घेतलेली असावी.

- भारतीय नागरिक, नेपाळी नागरिक, तसेच भारतात कायमचा राहण्याचा हेतू असणारे पाकिस्तान, बर्मा, श्रीलंका, केनिया, युगांडा, तंजानिया, झांबिया, मलावी, झैरे, इथिओपिया आणि व्हिएतनाम येथून आलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

- त्यासाठी त्यांच्याकडे भारत सरकारकडून प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा

- 26 मे 2025 रोजी उमेदवाराचे वय 21 ते 32 वर्षांच्या दरम्यान असावे.

- आरक्षित प्रवर्गासाठी वयात सवलत लागू आहे.

अर्ज कसा करायचा?

इच्छुक उमेदवारांनी भारतीय सेनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्जाचे फॉर्म डाउनलोड करणे आवश्यक आहे आणि त्यांनंतर तो भरून साधा किंवा स्पीड पोस्टद्वारे खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावा लागेल.

स्पीड पोस्ट पुढील पत्त्यावर करा

महानिदेशालय, रिमाउंट पशु चिकित्सा सेवा (RV-1), QM शाखा, एकीकृत मुख्यालय, संरक्षण मंत्रालय (सेना), पश्चिम ब्लॉक 3, ग्राउंड फ्लोर, विंग 4, आर. के. पुरम, नवी दिल्ली – 110066

निवड प्रक्रिया

- अर्जांची प्राथमिक तपासणी

- SSB इंटरव्ह्यू

- गुणवत्ता यादी

- वैद्यकीय तपासणी

निवड झालेल्या उमेदवारांना "कॅप्टन" पद देण्यात येईल आणि मेरठ कँट (UP) येथील RVC सेंटर आणि कॉलेजमध्ये प्रशिक्षण दिले जाईल.

पगार

- 80 हजार ते 1.20 लाख रुपये प्रतिमहिना

- यामध्ये मूल वेतन 61,300, सेना सेवा वेतन (MSP) 15,500, आणि किट भत्ता, महागाई भत्ता इत्यादीचा समावेश आहे.

जर तुमचं पात्रता निकष पूर्ण होत असेल, तर चुकवू ही संधी आणि नकालवकर अर्ज करा!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.