swt98.jpg
62752
वैभववाडीः शहरात काँक्रिटीकरणाकरिता रस्त्याचे खोदकाम सुरू आहे.
तळेरे-गगनबावडा महामार्ग सुसाट
काँक्रिटीकरण अंतिम टप्प्यातः जूनअखेर पूर्ण होणार
एकनाथ पवारः सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ९ः तळेरे-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावरील तळेरे-गगनबावडा या ३५ किलोमीटरच्या महामार्ग काँक्रिटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून जूनअखेरीस पूर्ण होण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत २१ किलोमीटरच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून दोन किलोमीटरच्या रस्त्याकामाला भूसंपादनामुळे विलंब होणार आहे.
मुंबई-गोवा आणि पुणे-बंगळूर या दोन महामार्गांना जोडणाऱ्या तळेरे-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्ग काँक्रिटीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. पहिल्या टप्प्यात कळे ते कोल्हापूर या १६ किलोमीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी १७१ कोटींची मंजुरी मिळाली होती. हे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात तळेरे ते गगनबावडा या ३५ किलोमीटर रस्त्याचे काम मंजूर झाले. दुसऱ्या टप्प्यात २१ किलोमीटर, तर तिसऱ्या टप्प्प्यात १४ किलोमीटरचे काम मंजूर झालेले होते. दुसऱ्या टप्प्यात या महामार्गावरील करूळ घाटरस्त्यांचा समावेश होता. हे काम पूर्ण होण्यासाठी ३७९ दिवस लागले. या कालावधीत हा घाटमार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला होता.
आता तळेरे-गगनबावडा महामार्गावरील ३५ किलोमीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू आहे. एकूण २२५ कोटींचा निधी या कामाकरिता मंजूर आहे. आतापर्यंत २१ किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. यामध्ये दहा किलोमीटरचा करूळ घाटरस्ता, कोकिसरे घंगाळवाडी ते नाधवडे या कामांचा समावेश आहे. सध्या तळेरे ते नाधवडे, कोकिसरे ते वैभववाडी, वैभववाडी ते एडगाव, करूळ जामदारवाडी या रस्त्याचे काम सुरू आहे. शिल्लक १४ पैकी २ किलोमीटर रस्त्यांच्या भूसंपादनाचा विषय प्रलंबित आहे. पाच ते सहा ठिकाणी तीव्र वळणे कमी करण्यासाठी भूसंपादन करण्यात येत आहे. त्यामुळे हा रस्ता रखडणार आहे. मात्र, उर्वरित १२ किलोमीटर रस्ता पूर्ण होण्यास २० जूनपर्यंतचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वैभववाडी शहरात कामाला सुरुवात केली आहे. शहरात १४ मीटर रुंदीचा रस्ता तयार केला जाणार आहे. त्यादृष्टीने खोदकाम सुरू आहे. हा रस्ता मेअखेर पूर्ण करण्याचा महामार्ग प्राधिकरणाचा प्रयत्न आहे.
दरम्यान, तळेरे-गगनबावडा महामार्गावर शुक, शांती, करूळ आणि गोठणा या चार नद्यांवर मोठे पूल बांधावयाचे होते. त्यापैकी गोठणा नदीवरील काम सुरू असून उर्वरित तिन्ही पुलांची कामे पूर्ण झाली आहेत. दोन पुलांवरून वाहतूक सुरू झाली आहे. शुक नदीवरील पुलाचा स्लॅब पूर्ण झाला आहे. त्यामुळे पुढील आठ ते दहा दिवसांत या पुलावरून देखील वाहतूक सुरू होणार आहे.
चौकट
पावसाळ्यापूर्वी काम होणे आवश्यक
वैभववाडी शहरातील कामाला ऐन मेमध्ये सुरुवात केली आहे. सध्या मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावागावांत आले असून बाजारपेठेत मोठी गर्दी झालेली दिसून येत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचे खोदकाम सुरू आहे. गेले दोन दिवस वैभववाडीत पाऊस पडत आहे. पावसाचे प्रमाण वाढले तर बाजारपेठेत चिखल होऊन वाहतुकीत व्यत्यय येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील काम पावसापूर्वी पूर्ण करावे, अशी मागणी नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.
चौकट
एक नजर...
* ३५ किलोमीटरकरिता २२५ कोटींचा निधी मंजूर
* ३५ पैकी २१ किलोमीटरचे काम पूर्ण
* १२ किलोमीटरचे काम जूनपूर्वी होणार पूर्ण
* भूसंपादन प्रक्रियेमुळे २ किलोमीटरचा रस्ता होणार पुढील वर्षी
* करूळ घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण होऊन वाहतूक सुरू