नवी दिल्ली : पाकिस्तानने भारतीय सीमांवर केलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी आज उच्चस्तरीय बैठकीत सीमावर्ती भाग त्याचप्रमाणे विमानतळांच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे. गृहमंत्री शहा यांच्या निवासस्थानी सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे ( सीआयएसएफ) महासंचालक तसेच गुप्तचर विभागाचे प्रमुख यांच्यासह गृहमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नियंत्रण रेषेवर रेषेवर पाकिस्तानकडून जम्मू- काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पूँछ, मेंढर आणि राजौरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर झालेल्या गोळीबारात सहा नागरिकांचा मृत्यू झाला असून मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानकडून सुरू असलेल्या चिथावणीखोर हल्ल्यांमुळे सीमाभागातील राज्यांमधील विमान वाहतुकीवरही याचा परिणाम झाला आहे. त्यापार्श्वभूमीवर सीमाभागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठीच्या संभाव्य उपाययोजनांची तसेच विमानतळांच्या सुरक्षेबाबत या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
गृह खात्याचे राज्यांना पत्रपाकिस्तानसोवतचा तणाव वाढत असताना गृह मंत्रालयाने शुक्रवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना संरक्षण उपाययोजना लागू करण्यास सांगितले आहे. यासंदर्भात गृह खात्याने सर्व राज्यांना पत्र पाठविले आहे. ‘नागरी संरक्षण नियम-१९६८’ अन्वये राज्य सरकारांनी नागरिकांचे, मालमत्तांचे संरक्षण तसेच महत्त्वाच्या सेवा सुरळीत राखण्यासाठी कार्यवाही करावी असे त्यात म्हटले आहे. तसेच नागरी संरक्षण संचालकांना आपत्कालीन खरेदीचे अधिकार देण्यात आले आहेत.
गडकरींकडूनही आढावासीमावर्ती राज्यांमध्ये आणीबाणीच्या परिस्थितीत रस्ते वाहतूक सुरळीत सुरू राहावी म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज आढावा घेतला. या बैठकीला रस्ते वाहतूक मंत्रालयाचे तसेच सीमावर्ती राज्यांचे ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते. सर्व अधिकाऱ्यांनी सावध तसेच आवश्यक व्यवस्थापनासाठी राज्य सरकारे आणि सुरक्षा संस्थांच्या संपर्कात राहावे, असे निर्देश गडकरी यांनी या बैठकीत दिले.