हौस ऑफ बांबू
न अस्कार! वादे वादे जायते तत्त्वबोध: असं कुणीतरी लिहिलेलं आठवतंय. कुणी बरं? हां, आठवलं! आमच्या वर्गातल्या (इयत्ता आठवी फ) बंडू बर्वेनं फळ्यावर लिहिलं होतं. त्याचं अक्षर सुरेख होतं. पण कुणीतरी नतद्रष्ट पोरानं ‘व’ चा ‘प’ केला, आणि बिचाऱ्या बंडूनं सरांचा मार खाल्ला होता. असो. लहानपणची ही आठवण. पण ती तरी का आठवली? हां, आत्ता आठवलं. ‘केल्याने अनुवाद मनुजा चातुर्य येतसे फार’ अशा आशयाचं एक खरमरीत पत्र मराठी भाषेचे बिनीच्या फळीतील शिलेदार रा. रा. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पाठवलं आहे.
‘‘मराठी भाषेत प्राचीन, अर्वाचीन, आधुनिक, समकालीन, वाङमयीन, वाङमयेतर, विविध ज्ञान, आणि परंपरा आणि त्यांच्या साहित्य आणि ज्ञानाचा प्रचंड मोठा वारसा आज उपलब्ध आहे. तो जगभरातील इतर भाषांमध्ये पोचल्यास हा वारसा (ऑटोम्याटिकली) जगभर पोहोचेल, सबब जल्द अज जल्द राज्य सरकारने अनुवाद अकादमी स्थापन करावी,’’ असा स्पष्ट आदेश रा. श्रीपाद भालचंद्रांनी बजावला आहे. हे आदेशपत्र त्यांनी मराठी भाषामंत्री उदयजी सामंत यांनाही पाठवले. त्यांना नेमका रिकामा वेळ हाताशी होता, म्हणून त्यांनी ते पत्र फोडले आणि वाचले. वाचून ते विलक्षण गंभीर झाले आणि तांतडीने मुख्यमंत्र्यांच्या दालनाकडे धाव घेतली. मुख्यमंत्री तेव्हा कुणाशी तरी इंग्रजी भाषेत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाबद्दल बोलत होते. त्यांना अर्जंट बाजूला बोलावून उदयजी सामंतांनी श्रीपाद भालचंद्रांचा खलिता दाखवला.
तेही गंभीर झाले…
‘‘आता काय करायचं?’’ उदयजींनी मुख्यमंत्र्यांना विचारलं.
‘‘आपल्यालाही अनुवाद लागतातच, हल्ली सरकारी मराठीतले शब्द लागता लागत नाहीत, मराठीतून मराठीत अनुवाद करण्याची सोय झाली तर बरंच!’’
मुख्यमंत्र्यांनी थेट मोदीजींची पोझ घेऊन पोक्त विचार केला. पोक्त विचार करताना ते नेहमी अशीच पोझ घेतात.
‘‘अशी अकादमी आपण स्थापन केली, तर अनुवाद अकादमी स्थापन करणारं जगातलं पहिलंच राज्य अशी आपली ओळख जगभर होईल, असं ते म्हणतायत,’’ उदयजींनी पोक्त विचारासाठी आणखी रसद पुरवली.
‘‘गिनीज बुकात जाऊ का आपण? गेला बाजार लिम्का बुकात?’’ मुख्यमंत्र्यांनी क्वेरी काढली.
‘‘बहुतेक जाऊ! एक वेळ अशी येईल की आपण दोघं दाव्होसला गुंतवणुकीचे करार करु, तेव्हा मसुदासुद्धा मराठीत असेल साहेब!’’ उदयजींनी आल्प्स पर्वताएवढं स्वप्न तिथल्या तिथं पाहिलं…
‘‘इटलीत सांबार वडी आणि वडाभात मिळेल?,’’ मुख्यमंत्र्यांनी तेच स्वप्न नागपुरात नेलं.
‘‘एकदा मराठी रेसिपी बुक इटलीत गेलं तर काय कठीण आहे? मला तर वाटतं, एखादा पोवाडाही फ्रेंच भाषेत म्हणता येईल,’’ उदयजींनी अनुवादाचं महत्त्व पटवून दिलं.
‘‘खरंच, मी आजवर उगीच गुगल ट्रान्सलेशनवर अवलंबून राहिलो, चुकलंच!,’’ मुख्यमंत्री मराठीत हळहळले.
‘‘मी सुद्धा! हे आपल्याला आधी का बरं सुचलं नाही? अभिजात दर्जा मिळाला तेव्हाच अनुवाद अकादमीची घोषणा केली असती तर एव्हाना कोल्हापूरच्या मेहता कंपनीचं मुख्य कार्यालय सॅनफ्रान्सिस्कोला असतं,’’ उदयजी सामंतांनी मनातल्या मनात एक सामंजस्य करार उरकून घेतला.
‘‘मग? काय करायचं? अनुवाद अकादमी करु या स्थापन?,’’ मुख्यमंत्र्यांनी फायनल विचारलं.
‘‘श्रीपाद भालचंद्र जोशीसाहेब म्हणतायत, तर करु या की! नाही तर ते भंडावून सोडतील, बघा बुवा!,’’ उदयजींनी भविष्यातील धोक्यांची कल्पना मुख्यमंत्र्यांना दिली. श्रीपाद भालचंद्र स्वत: समोर उभे आहेत, हे चित्र डोळ्यासमोर येऊन त्यांनी डोळे घट्ट मिटून घेतले, आणि…
…आणि खिशातून पेन काढून त्या आदेशपत्रावर कावळा काढला. शेरा लिहिला, ‘‘बाब विचाराधीन!’’