पहलगामचा दहशतवादी हल्ला, निष्पापांचे बळी यांचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला करत 100 दहशतवाद्यांना ठार केलं. मात्र या कारवाईमुळे बिथरलेल्या पाकिस्तानाने पुन्हा आगळीक करत गेल्या 2-3 दिवसांपासून सातत्याने भारतावर ड्रोन हल्ले तसेच मिसाईल हल्ला आणि गोळीबार करण्यास सुरूवात केली. भारताने या कृतीला चोख प्रत्युत्तर देत पाकचे सर्व हल्ले परचतून लावते, त्यांचे बेत हाणू पाडले. भारत आणि पाकिस्तानमधील जणाव आणि युद्ध अद्यापही सुरूच आहे. दहशतवादाला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला त्याच्या कृत्यांची शिक्षा मिळत आहे. भारताने केलेल्या प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून केलेल्या प्रत्युत्तर कारवाईत पाकिस्तानचे मोठे नुकसान होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या कारवाईत पाकिस्तानच्या अनेक लष्करी आस्थापनांचे आणि मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे.
सूत्रांच्या सांगण्यानुसार, रावळपिंडीतील नूर खान, चकवालमधील मुरीद आणि शोरकोटमधील रफीकी यांच्या हवाई तळांवर हल्ला करण्यात आला. हल्ल्यामुळे तेथील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने आज दुपारी 12 वाजेपर्यंत आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे; पेशावरला जाणारे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (पीआयए) चे विमान पीआयए 218, जे त्यांच्या हवाई हद्दीतील शेवटचे उड्डाण होते, त्याला क्वेट्टावरून उड्डाण करण्यास भाग पडलं आहे.
इस्लामाबाद आणि लाहोरमध्येही जोरदार स्फोट
याचदरम्यान पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबाद आणि लाहोरसह अनेक शहरांत स्फोटांचे जोरदार आवाज ऐकू आले. मात्र भारताने डागलेले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र भारतीय हद्दीतच पडले, असा दावा पाकिस्तानी लष्कराने केला. पण भारताकडून या संदर्भात अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
तर दुसरीकडे, सीमेपलीकडून पाकिस्तानने केलेल्या अनेक ड्रोन हल्ल्यांनंतर, भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) नीलम व्हॅली आणि सियालकोटमध्ये मोठा हल्ला केला. या हल्ल्यात पाकिस्तानचेही मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
भारताची मजबूत एअर डिफेन्स सिस्टीम
भारताने सिरसा येथे भारतीय हवाई क्षेत्रात पाकिस्तानच्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राला यशस्वीरित्या रोखल्याचे सोशल मीडियावरील अनेक व्हिडीओद्वारे दिसून आले. सीमेवरील गोळीबाराच्या घटनेनंतर, जिल्हा माहिती आणि जनसंपर्क अधिकाऱ्यांनी रहिवाशांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला भारताकडून हाणून पाडला जात आहे. सीमावर्ती भागात एस-400, आकाशतीर, एल-70, जु-23 आणि शिल्का यासारख्या उत्कृष्ट हवाई संरक्षण प्रणाली आकाशात वर्चस्व गाजवताना दिसत आहेत. ड्रोनद्वारे भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचे पाकिस्तानचे नापाक डाव उधळून लावण्यात ही सिस्टीम भारताला मदत करत आहे.