IND vs PAK: युद्धाच्या परिस्थितीतही भारत-पाकिस्तान संघात का झाला सामना? बंदीची भीती अन्...
esakal May 10, 2025 10:45 PM

भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील संबंध बिघडत चालले आहेत. दोन्ही देशांमध्ये युद्ध होण्याची स्थितीही निर्माण झाली आहेत. अशात त्याचा परिणाम विविध क्षेत्रावर होत असून यात क्रीडा क्षेत्राचाही समावेश आहे.

आयपीएल २०२५ स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले आहे. पण या परिस्थितीत भारताच्या बीच हँडबॉल संघाला पाकिस्तानविरुद्ध सामना खेळावा लागला आहे. मस्कतमध्ये सध्या १० वी आशियाई बीच हँडबॉल चॅम्पियनशीप स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत शुक्रवारी भारत - पाकिस्तान संघात सामना झाला.

या सामन्यात भारतीय संघाने दंडाला काळी पट्टीही बांधली होती. पण त्यांना आशियाई हँडबॉल फेडरेशनने काळी पट्टी काढून टाकायला लावली. ती जर काढली नसती, तर भारतीय संघाला स्पर्धेतून बाहेर काढण्याची कारवाई झाली असती. खरंतर भारतीय संघाने हा सामना न खेळण्याचा विचार केला होता. पण त्यांच्यावर बंदीची कारवाई झाली असती, तसेच दंडही भरावा लागला असता. त्यामुळे नाईलाजाने भारताने हा सामना खेळला.

हँडबॉल फेडरेशन ऑफ इंडिया (HFI) चे कार्यकारी संचालक आनंदेश्वर पांडे यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की 'आंतरराष्ट्रीय हँडबॉल फेडरेशन (IHF) च्या चार्टरनुसार जर सामना खेळला नसता तर आम्हाला १० हजार डॉलर दंड भरावा लागला असता आणि आमच्यावर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दोन वर्षांच्या बंदीची शक्यता होती.'

'आशियाई हँडबॉल फेडरेशनने आम्हाला स्पष्ट सांगितले होते की जर भारतीय संघ या सामन्यासाठी आला नाही, तर ऑलिम्पिक चार्टरच्या भावनेविरुद्ध असल्याचे समजले जाईल. आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.'

त्यांनी पुढे सांगितले की 'आम्ही सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी हँडबॉल फेडरेशन ऑफ इंडियाने हा सामना खेळावा की नाही,यासाठी क्रीडा मंत्रालय आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनला पत्रही लिहिलं होतं. त्यांनी या मेलला त्वरित उत्तर दिले नाही. त्यामुळे आम्हाला सामना खेळावा लागला. '

पांडे पुढे म्हणाले, या स्पर्धेसाठी अनेक महिन्यांपूर्वीच सहभाग निश्चित करण्यात आला होता. ५ मे रोजीच भारताचे महिला आणि पुरुष संघ मस्कतला पोहचले होते. आम्हाला माहित नव्हते की दोन देशातील परिस्थिती इतकी खराब होईल.'

'आता या स्पर्धेत दोन संघ पुन्हा उपांत्य किंवा अंतिम सामन्यात आमने-सामने येण्याचीही शक्यता आहे. पण त्याआधी आम्ही क्रीडा मंत्रालय आणि आयओएच्या उत्तराची वाट पाहत आहोत. जर त्यांनी सांगितले की सामना खेळू नका, तर आम्ही खेळणार नाही. '

या स्पर्धेचा अंतिम सामना १५ मे रोजी खेळला जाणार असून ही स्पर्धा आगामी बीच हँडबॉल वर्ल्ड चॅम्पियन २०२६ स्पर्धेसाठी पात्रता फेरी आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.