शालेय विद्यार्थ्यांचा असुरक्षित प्रवास
कारवाई करण्याची शालेय बस संघटनेची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : राज्यात ६० हजार अनधिकृत शाळेच्या बस विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने वाहतूक करत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यात अनधिकृत ४० हजार व्हॅन मोकाट असून शालेय विद्यार्थ्यांना असुरक्षित प्रवास करावा लागत आहे. त्यांच्यावरदेखील कारवाई करावी, अशी मागणी स्कूल बस ओनर्स असोसिएशन यांनी केली आहे.
राज्यात विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास सुरू असल्याच्या अनेक तक्रारी स्कूल बसचालक- मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. बसचालक- मालकांनी संबंधित प्रादेशिक मोटर वाहन कार्यालयात दंडात्मक रक्कम भरून आपल्या बस अधिकृत कराव्यात, अन्यथा कारवाईचा इशारा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग म्हणाले, की बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसवर कारवाई योग्य आहे; पण त्यासोबतच स्कूल व्हॅन, रिक्षांच्या माध्यमातून होणारी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित नाही. व्हॅनचालक अतिशय बेदरकार वाहने चालवत कोणालाही पुढे जाऊ देत नाहीत. एखाद्या वाहनचालकाने रस्ता दिला नाही, तर त्याला शिव्या देणे, मारामारी करणे, असे प्रकार होतात, असे त्यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १२ पेक्षा कमी आसन क्षमता असलेल्या वाहनांना विद्यार्थी वाहतूक करण्यास मनाई आहे. तरीही व्हॅनमधून विद्यार्थी वाहतूक केली जाते. विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका आहे. राज्यात ४० हजार अशा व्हॅन आहेत. त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे.
- अनिल गर्ग, अध्यक्ष स्कूल बस ओनर्स असोसिएशन