पिंपरी, ता. १० : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत (पीएमआरडीए) समाविष्ट असलेल्या मोशी येथील सेक्टर १२ मधील रहिवाशांनी पाणी प्रश्नावरून प्रशासनाला इशारा दिला आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्याच्या प्रश्नासाठी तब्बल २५० कुटुंबियांकडे दुर्लक्ष केले जात आहे. गृहप्रकल्पातील सोसायट्यांना महापालिका आणि पीएमआरडीए या दोन्हींकडून आश्वासन देण्यात येत आहे. प्रत्यक्षात त्याची दखल घेतली जात नाही. या समस्या न सुटल्यास पीएमआरडीए कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.
सेक्टर १२ या ठिकाणी असलेल्या माहुलीगड आणि गोरखगड या दोन्ही सोसायाटीत पाण्याच्या प्रश्नांवर गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक रहिवाशांनी तक्रारी केल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात अपुरा पाण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. याप्रकरणी पीएमआरडीएत अनेक निवेदने दिली आहेत. मात्र, कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. या सोसायट्यांना पाण्यासाठी दोन लाखांहून अधिक खर्च करावा लागतो. अखेर अपुरा पाणी असल्याने कूपनलिकादेखील खोदली. मात्र, त्याला पाणी नसल्याने त्यासाठीचा खर्चदेखील वाया गेला आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी याठिकाणी पाहणी करून गेले. मात्र, त्यावर तोडगा निघू शकला नाही. या संबंधित अंतर्गत जलवाहिनी टाकणे, परवानगी आदी पीएमआरडीए अखत्यारीत येत असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार पीएमआरडीएकडे मागणी करा, असा सल्ला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिला. दरम्यान, पीएमआरडीए अधिकारी याबाबत लक्ष घालत नाहीत. आता सोसायटीमधील जमा झालेला निधी हा पाण्यावरती मोठ्या प्रमाणात खर्च होत आहेत. त्यासाठी पीएमआरडीए आणि महापालिका या दोन्ही विभागांनी यावर एकत्रित येऊन तोडगा काढावा, अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे. अन्यथा, कार्यालयावर हंडा मोर्चा काढावा लागेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
---