India Pakistan War : भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली आहे. दोन्ही देशांनी अधिकृतपणे तसे सांगितले आहे. दरम्यान, दोन्ही देशांतील युद्धजन्य परिस्थिती निवळत आहे, असे सांगितले जात असतानाच भारत-पाकिस्तानने सीमेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. याच कारणामुळे सध्या सीमाभागात तणाव निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भारत आणि पाकिस्तान सीमाभागात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानने काश्मीरमध्ये ड्रोन हल्ले केले आहेत. श्रीनगरमध्ये 50 हून अधिक स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. पंजाब, राजस्थान राज्यातील सीमाभागातही ड्रोन दिसल्याचे वृत्त आहे. याच कारणामुळे पंजाब, राजस्थान, जम्मूत ब्लॅकआऊट करण्यात आले आहे. पंजाबच्या एकूण 9 शहरांत संपूर्णपणे ब्लॅकआऊट करण्यात निर्णय घेण्यात आला आहे. पंजाबच्याही भोगा परिसरात ब्लॅकआऊट करण्यात आले आहे.
तसं पाहायचं झालं तर पाकिस्तान सरकारनेच भारताला कॉल करून शस्त्रसंधीच्या चर्चेला सुरुवात केली होती. त्यानंतर मात्र अवघ्या काही तासांत पाकिस्तानच्या लष्कराने भारतावर हल्ले केले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानी लष्कर आता पाकिस्तानी सरकारच्या विरोधात गेले आहे. त्यामुळेच आता पाकिस्तानी आर्मीने पाकिस्तानी सरकारविरोधात बंड तर केले नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, आता पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यावर भारत सरकार आणि लष्कर नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.