- शिल्पा कांबळे, saptrang@esakal.com
रानटी टोळ्यांत राहणारा माणूस भटकंती करता करता हळूहळू स्थिर होत गेला. या उत्क्रांतीतूनच कुटुंबव्यवस्थेचा विकास झाला. सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागल्यानंतर पितृसत्ता, धर्मसत्ता बळकट होत गेल्या.
या व्यवस्थेच्या स्थिरतेसाठी स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर अनेक बंधने येत गेली. स्त्रीच्या अविरत त्यागावर आणि श्रमांवर या कुटुंबसंस्थेचा डोलारा उभा राहिला. हजारो वर्षांचा इतिहास मागे सारला, तरी आजही आपल्याला घराघरांत काय दिसते?...
स्त्रिया पुरूषांच्या आधी उठतात आणि त्याच्या नंतर विश्रांती घेतात. जगभरातील बायका पुरूषांपेक्षा सरासरी दोन ते चार तास जास्तच काम करतात. जुन्या काळात तर बायकांना पहाटे उठून जात्यावर दळण दळावे लागायचे. आपल्या संस्कृतीचे दर्शन म्हणून जात्यावरच्या ओव्या आपण फार अभिमानाने मिरवतोही; पण त्या ओव्यांमागचे दुःख आपल्या लक्षात येते का... एका ओवीतील ओळ अशी आहे- ‘दळू बाई दळू, जात्याला येतं रडू’!
दगडापासून बनलेल्या कठोर जात्याला कशामुळे रडायला येत असेल?... जाते रडत होते, की जात्यावर कंबर दुखेपर्यंत दळण दळणाऱ्या सुना-मुलींना रडायला येत होते?... अपुऱ्या झोपेत आणि माहेरच्या सुखाची आठवण करत या बायका-मुली रडत असतील का? त्यांची सुखदुःखे ऐकायला घरात कुणी नसेल म्हणून त्या जात्यालाच आपली दुःखे सांगत असतील का?...
काळ पुढे सरकला. आता दगडाचे जाते गेले आणि भय्याची पिठाची चक्की आली! पण आजही स्त्रियांच्या वाट्याचे कष्ट संपलेले नाहीत. भारतातील अंदाजे ६५ टक्के लोकसंख्या शेतीवर अवंलबून आहे. तासंतास शेतात उन्हातान्हात राबणाऱ्या स्त्रियांचे चुलीसमोर, नाही तर उज्ज्वला गॅससमोरचे घरकाम चुकलेले नाही.
‘रांधा वाढा उष्टी काढा’ ही कोणत्याही काळात, कोणत्याही भागात राहणाऱ्या बाईची गोष्ट आहे. पुरूषांना श्रमपरिहार करण्यासाठी दारू, सिगारेट, तमाशा, न्यूज चॅनल, पत्ते, क्रिकेट, कॅरम, असे अनेक छंद असतात. आपल्या स्त्रियांकडे टीव्ही पाहण्यापेक्षा दुसरा स्वस्त विरंगुळा नसतो!
पुष्कळदा हा टीव्ही काम करता करता ऐकायचा असतो. त्यामुळेच टीव्हीवरच्या मालिका बटबटीत आणि बोलक्या बनवलेल्या असतात. या मालिकांचा प्रेक्षक हा प्रामुख्याने घरकाम करत करत टीव्ही पाहणारा स्त्रीवर्ग असतो. भारतातील ग्रामीण आणि शहरी वास्तव हे असे आहे!
स्त्रिया ऑफिसात नोकरी करतात आणि घरी येऊन स्वयंपाकघरही संभाळतात. महिन्याचा किराणा आणणे, सामान डब्यात भरणे, मिक्सर-फ्रिज पुसणे, बारदाने धुणे, चपात्यांचा डबा घासणे, कचऱ्याच्या डब्याला पिशवी लावणे, वाळत टाकलेल्या कपड्यांच्या घड्या घालणे, लोणच्याची बरणी स्वच्छ करणे... कामांची ही यादी न संपणारी आहे.
एका कवितेची ओळ आहे ना- ‘औरत कामसे कामपर लौटती हैं’! भले शहरातील कुटुंबांमध्ये घरकामाला मदतनीस असली, तरी ‘घराचे मॅनेजमेंट’ ही स्त्रियांचीच जबाबदारी असते. ‘गृहस्वामिनी’ हा शब्द आकर्षक वाटत असला, तरी फसवा आहे. तो स्त्रियांच्या कष्टांचे गौरवीकरण करणारा असला, तरी त्यांच्या कष्टाला न्याय देणारा नाही.
त्यात घरकामाला येणारी कामगार बाई इथे मॅडमकडे भांडी-लादी करून आपल्या घरी परत रांधा वाढा उष्टी काढा हे काम करतच असते ना! तिची डबल-ट्रिपल शिफ्ट चालूच असते. मध्यंतरी ‘द ग्रेट इंडियन किचन’ नावाचा मल्याळी सिनेमा फार गाजला होता. वरवर पाहता या सिनेमाची गोष्ट अगदी साधी होती. एक मुलगी लग्न करून नांदायला येते.
तिथे स्वयंपाकघरात सतत तुंबणारे एक सिंक असते. ते दुरूस्त करा, असे नवऱ्याला सांगून सांगून ती थकते. स्वयंपाकघरातील या घाणीला, उष्णतेला गुदमरून गेलेली मुलगी अखेर कंटाळून ते घर सोडण्याचा निर्णय घेते! या सिनेमाच्या लेखक-दिग्दर्शकाची (Jeo Baby) प्रत्यक्ष मुलाखत मी ऐकली होती. हा सिनेमा त्याला सुचण्यामागची कहाणीही अगदी साधी आहे.
त्याच्याकडे कुणी एक पाहुणा आला होता. त्या पाहुण्यासाठी या लेखकाने कॉफी केली. बहुतेक त्या पाहुण्याला ती कॉफी आवडली नाही. आपण एवढे कष्ट करून बनवलेली कॉफी पाहुण्यांना आवडली नाही, हे लेखकाला खूपच टोचले.
एका कॉफीसाठी आपल्याला इतके वाईट वाटते, तर मग आपल्या घरातील स्त्रिया वर्षानुवर्षे स्वयंपाक करत आहेत, त्यांना किती सहजतेने ‘जेवण चांगले झाले नाही,’ असे आपण बोलतो, त्यांच्या कष्टांचा अपमान करतो, याची त्याला अचानक जाणीव झाली. पैशांची तंगी असतानाही स्वयंपाकघरात राबणाऱ्या बायकांची व्यथा सांगण्यासाठी त्याने हा सिनेमा तयार केला.
या लेखक-दिग्दर्शकाप्रमाणे प्रत्येक घरातील पुरूष बदलला, त्याला बायकांच्या स्वयंपाकघरातील कष्टांची जाणीव झाली, तरच स्त्रियांच्या वाट्याचे हे कष्ट थांबू शकतील! त्यासाठी मुलग्यांना घरकामात सहभागी करून घ्यायला हवे. माझ्या पंधरा वर्षांच्या मुलाला मी जाणीवपूर्वक स्वयंपाकघरात काम करायला शिकवले आहे.
डोसा करणे, ऑम्लेट तव्यावर टाकणे, लसूण सोलणे, फ्रिजमध्ये सामान ठेवणे, ही कामे अगदी साधी आहेत. पण स्वयंपाकघराची त्याला ओळख करून देण्यासाठी आवश्यक आहेत. आपण मुलांना लाखो रूपयांच्या फिया भरून ‘नीट’, ‘जेईई’च्या क्लासला घालतो, पण घरातील स्वयंपाकघराची ओळख मुलांना करून देतो का?... परदेशात शिक्षण आणि व्यवसायासाठी गेलेल्या भारतीय मुलांना घरकाम जड जाते ते याचमुळे.
घरकाम ही घरातील प्रत्येक सदस्याची जबाबदारी आहे. सुखी कुटुंब म्हणजे असे कुटुंब, ज्यात कुटुंबातील स्त्री सुट्टीच्या दिवशी पाय पसरून पेपर वाचत बसली आहे किंवा घरातच काहीही काम न करता अंथरूणावर लोळत आहे. तिला नाष्टा तयार करण्याची, वॉशिंग मशीनला कपडे लावण्याची किंवा बाईला जेवणाचा मेन्यू सांगण्याची काही गरज नाहीये...
हळूहळू का होईना पण असा बदल काही घरांमध्ये दिसू लागला आहे. स्त्रिया संसाराची काळजी न करता ‘सोलो पिकनिक’ करू लागल्या आहेत. बेफिकिरीने जगत आहेत. मैत्रिणींबरोबर गप्पाटप्पा करण्यासाठी ‘सीएल’ टाकत आहेत. घरातील हॉलमध्ये पुस्तकांची थप्पी लागलेली आहे. गरगर फिरणाऱ्या पंख्याच्या गार हवेत बसून त्या रहस्यमय कांदबऱ्या वाचत आहेत!
‘शंतरज के खिलाडी’ सिनेमातील नवाबांसारख्या बायका बुद्धीबळाचे डाव टाकून बसलेल्या आहेत. एकेक चाली रचून प्रतिस्पर्ध्याला चीत करत आहेत. झगझगीत लाईट लावून कॉलनीतील मुली कॅरमच्या स्पर्धा खेळत आहेत. जोक्स मारत आहेत, टाळ्या वाजवत, हसत चित्कारत आहेत. गावी सणासुदीच्या दिवसाला पुरूष घरासमोर रांगोळी काढत आहेत, दिव्यांची रोशणाई करत आहेत. बाबा-काका स्वयंपाकघरात करंज्या तळत आहेत. गॅलरीत बसून मामेभाऊ लाडू वळत आहेत. मुलगे घरात आलेल्या पाहुण्यांसाठी चहा टाकत आहेत...
वरील परिच्छेदात थोडी अतिशयोक्ती वाटतेय ना! असे कसे शक्य आहे?... पुरूषांना कुठे जमणार हे सगळे?... ‘आमच्या घरातील बायकांना स्वतःच स्वयंपाक करायला आवडतो’, ‘त्याच घराबाहेर पडत नाहीत’, ‘त्यांनाच स्वच्छता लागते’, ‘त्यांच्याच हाताला चव असते,’ अशा सबबी आता चालणार नाहीत! घरातील बायकांनी खूप खूप कष्ट केले. त्यांच्या उत्क्रांतीची वेळ आता आली आहे. कुटुंबसंस्थेला सृदृढ व्हायचे असेल तर पुरूषांना स्वयंपाकघरात यावेच लागेल. वेलकम टू किचन! स्त्रियांना पुरूषांना आमंत्रण द्यावेच लागेल.