भांडुपमध्ये युवासेनेचा पाहणी दौरा
esakal May 11, 2025 08:45 PM

भांडुपमध्ये युवासेनेचा पाहणी दौरा
विविध समस्यांवर अधिकाऱ्यांशी चर्चा
मुलुंड, ता. ११ (बातमीदार) ः भांडुप व खिंडीपाडा भागात नागरिकांना भेडसावत असलेल्या विविध नागरी अडचणींवर लक्ष केंद्रित करून युवासेनेच्या वतीने नुकताच एक पाहणी दौरा पार पडला. हा दौरा युवासेना कार्यकारिणी सदस्य राजोल संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि खासदार संजय दिना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.
खिंडीपाडा येथील पुलाखालील सखल भागात पावसाळ्यात साचणारे पाणी वाहतुकीस अडथळा ठरत असून, त्यामुळे वाहनचालकांना मोठा धोका पत्करावा लागतो. त्याशिवाय परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था, मोठे खड्डे, अर्धवट झालेली दुरुस्ती आणि साचलेला कचरा यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळित झाले आहे. या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला.
पाहणीदरम्यान महापालिकेचे एस आणि टी विभागाचे सहाय्यक आयुक्त, रस्ते व वाहतूक विभाग, जलपुरवठा व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, पोलिस निरीक्षक, संबंधित कंत्राटदार आणि अनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते. प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेत तत्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले असून, पावसाळ्यापूर्वी आवश्यक कामे पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.