IPL 2025 मधील महाअंतिम सामना कोलकाताऐवजी अहमदाबादमध्ये? कारण..
GH News May 12, 2025 03:04 AM

भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आयपीएल 2025 स्पर्धा स्थगित करण्यात आली. बीसीसीआयने 9 मे रोजी आयपीएलचा 18 वा मोसम स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र दोन्ही देशातील तणाव निवळल्यानंतर लवकरच आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. उर्वरित 16 सामन्यांचं सुधारित वेळापत्रक लवकरच बीसीसीआयकडून जाहीर करण्यात येणार आहे. मात्र त्याआधी आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. नियोजित वेळापत्रकानुसार या मोसमातील अंतिम सामना कोलकातामधील ईडन गार्डन्समध्ये आयोजित करण्यात आला होता. आता मीडिया रिपोर्ट्सनुसार,हा अंतिम सामना ईडन गार्डन्समध्ये खेळवण्यात येणार नसल्याचं म्हटलं जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र तसं झाल्यास स्थानिक क्रिकेट चाहत्यांची निराशा होणार, हे निश्चित आहे.

नक्की कारण काय?

या मोसमात 57 सामन्यांचं यशस्वी आयोजन करण्यात आलं. तर 8 मे रोजी सुरक्षेच्या कारणामुळे धरमशाळेतील सामना स्थगित करण्यात आला. या हंगामात अंतिम सामन्यासह एकूण 74 सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे उर्वरित सामने कुठे आयोजित होणार? याचीही उत्सुकता चाहत्यांना आहे. मात्र या दरम्यान अंतिम सामना 30 मे रोजी आयोजित केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे 30 मे रोजी कोलकातामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

अहमदाबादमध्ये ‘फायनल’?

पीटीआयच्या रिपोर्टनुसार, कोलकातामध्ये 30 मे रोजी पाऊस होण्याची 65 टक्के शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून अंतिम सामना हा कोलकाताऐवजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित केला जाऊ शकतो.

एका आठवड्यासाठी स्पर्धा स्थगित

शेजारी देशासोबतच्या तणावामुळे बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रकाद्वारे 9 मे रोजी आयपीएल 2025 स्पर्धा आठवड्यासाठी स्थगित करण्यात येत असल्याचं जाहीर केलं होतं. तोवर 57 सामने यशस्वीरित्या पार पडले होते. तर 8 मे रोजीचा पंजाब विरुद्ध दिल्ली सामना स्थगित करण्यात आला होता. अशात आता पंजाब-दिल्ली सामन्यासह एकूण 17 सामन्यांच्या आयोजनसाठी 2 आठवड्यांचा कालावधी अपेक्षित आहे.

त्यामुळे बीसीसीआय लवकरच उर्वरित सामने आयोजित करण्याच्या तयारीत आहे. सध्या बीसीसीआय संबंधित यंत्रणांसह या सामन्यांच्या आयोजनासाठी पूर्णपणे सुरक्षित ठिकाणांच्या शोधात आहे. दोन्ही देशांतील तणावानंतर स्पर्धेतील सहभागी विदेशी खेळाडू मायदेशी परतले. त्यामुळे आता सुधारित वेळापत्रक जाहीर होताच हे खेळाडूही परतण्याची आशा आहे. मात्र काही खेळाडूंनी परतण्यास नकार दिल्याचंही म्हटलं जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.