भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने सोमवारी कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. त्याने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत १४ वर्षांच्या करियरनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातली.
भारताचे नेतृत्व करताना अनेक अविश्वसनीय विजय मिळवले. तो भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधारही बनला. तब्बल ४२ महिने त्याच्या नेतृत्वात भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर राहिले. त्याने ११ कसोटी मालिकांपैकी १० कसोटी मालिका जिंकल्या.
त्याने फलंदाजीतही मोठे विक्रम केले, तो सर्वाधिक ७ द्विशतके करणारा भारतीय देखील आहे. २०११ ला कसोटीत पदार्पण करणाऱ्या कोहलीची कारकिर्द खरोखर विराट राहिली, त्यामुळे त्याच्या निवृत्तीवर जगभरातून प्रतिक्रिया आल्या आहेत. केवळ क्रिकेटविश्वातूनच नाही, तर वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींनी विराटच्या कसोटी निवृत्तीवर प्रतिक्रिया दिली आहे.
विराटच्या निवृत्तीची पोस्ट इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करताना महान टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने लिहिले, 'शानदार इनिंग विराट'. याशिवाय विराटचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी मानला जाणाऱ्या स्टीव्ह स्मिथनेही इंस्टाग्राम स्टोरीवर विराटबद्दल म्हटलंय, 'शानदार कसोटी कारकिर्दीसाठी अभिनंदन विराट.'
युकेचे माजी पंतप्रधान ऋषि सुनक यांनीही विराटच्या निवृत्तीवर पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले, 'या उन्हाळ्यात विराटला शेवटचे इकडे खेळताना पाहाता येणार नसल्याचे वाईट वाटत आहे. तो या खेळातील दिग्गज आहे. अफलातून फलंदाज, उत्तम कर्णधार आणि जबरदस्त स्पर्धत, ज्याला कसोटी क्रिकेटचे खरे मूल्य समजले आहे.'
प्रतिष्ठेची टेनिस स्पर्धा विम्बल्डनकडूनही विराटचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. विराटचा जवळचा मित्र आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलियर्सने लिहिले, 'माझा बिस्कोटी, विराट तुझ्या शानदार कसोटी कारकिर्दीसाठी अभिनंदन. तुझे समर्पण आणि कौशल्य नेहमीच मला प्रेरणा देते. खराखुरा दिग्गज.'
याशिवाय देखील अनेकांनी विराटच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया दिली आहे. विराटने त्याच्या कसोटी कारकिर्दीत १२३ सामने खेळताना ५५.५७ च्या सरासरीने ९२३० धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या ३० शतकांचा आणि ३१ अर्धशतकांचा समावेश आहे.