हैदराबादमधील कराची बेकरीची तोडफोड; भाजप कार्यकर्त्यांच्या सहभागाचा आरोप पक्षाने फेटाळला
BBC Marathi May 13, 2025 04:45 AM
UGC कराची बेकरी

शनिवारी (10 मे) गळ्यात भगव्या रंगाचे रुमाल असलेल्या कार्यकर्त्यांकडून हैदराबादमधील कराची बेकरीची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे.

या घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी अद्याप कुणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हैदराबादमधील शमशाबाद भागात असलेल्या कराची बेकरीची तोडफोड झाल्याचे पोलीस निरीक्षक बालाराजू यांनी बीबीसी तेलुगुशी बोलताना सांगितले.

या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये 10 ते 15 जण कराची बेकरीचा बोर्ड तोडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

या लोकांनी भगवे झेंडे हातात धरले होते आणि 'भारत माता की जय' अशा घोषणा देत होते.

याशिवाय, कराची बेकरीच्या कर्मचाऱ्यांना दुकानाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वजाची स्टिकर्स चिकटवायला भाग पाडल्याचा आरोप आहे.

या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे निरीक्षक बालाराजू यांनी सांगितले.

संबंधित कार्यकर्ते हे भाजपचे असल्याचा आरोप काही जण करत होते, भाजपने हे आरोप फेटाळले असून त्या लोकांशी भाजपचा काही संबंध नसल्याचे प्रदेश भाजपने म्हटले आहे.

भाजपने या घटनेपासून हात झटकले आहेत. या तोडफोडीबाबत भाजपचा काहीही संबंध नसल्याचं तेलंगाना भाजपचे प्रवक्ते पोरेड्डी किशोर रेड्डी यांनी बीबीसीला सांगितलं.

ही पहिलीच घटना नाहीये

आंध्रप्रदेश आणि तेलंगानामध्ये कराची बेकरीची तोडफोड करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये.

याआधी पुलवामाच्या हल्ल्यानंतर काही लोकांनी हैदराबादमधील बेकरीसमोर निषेध केला आणि कराची नावाचा बोर्ड झाकण्याचा प्रयत्न केला होता.

भारत - पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने अशी घटना आता पुन्हा घडली आहे.

5 मे रोजी जनजागरण समिती संघटनेनं विशाखापट्टणममधील कराची बेकरीसमोर निषेध केला आणि बेकरीने नाव बदलण्याची मागणी केली.

"नाव बदलले नाही तर कराची बेकरीच्या मालकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत," अशी मागणीही या संघटनेने केली.

तसंच, दहा दिवसांत कराची बेकरींची नावे बदलली नाहीत तर ते त्यांच्यावर पेट्रोल ओतून त्यांना आग लावली जाईल, असा इशारा संघटनेनं दिला आहे.

UGC 2019मधील कराची बेकरीचं निवेदन

2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर बेकरी मालकांनी त्यांच्या मुळांबद्दल एक निवेदन प्रसिद्ध केलं होतं.

"कराची बेकरीची सुरुवात खानचंद रामनानी नावाच्या व्यक्तीने केली होती. ते फाळणीदरम्यान पाकिस्तानातून भारतात आले होते. 1953 मध्ये तेलंगानातील हैदराबादमध्ये त्यांनी या बेकरीची स्थापना केली. नंतर त्यांच्या भारतभर शाखा काढण्यात आल्या. ही एक अस्सल भारतीय बेकरी आहे. त्यामध्ये कोणताही गैरसमज नसावा," असं या निवेदनात म्हटलं आहे.

फाळणीनंतर हजारो हिंदू समुदाय पाकिस्तानातून भारतात आला. त्यांना तेव्हा सिंधी म्हणून ओळखलं जायचं. भारताच्या अनेक भागात त्यांना वसवण्यात आलं. यापैकी अनेक लोकांनी व्यवसाय सुरू केले आणि देशातील महत्त्वाच्या ठिकाणी कामही केलं.

UGC 10 मे रोजी कराची बेकरी तोडफोड करताना

त्यापैकी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे देखील सिंधी आहेत. कराची बेकरीचे संस्थापकही याच श्रेणीतील आहेत. वकील राम जेठमलानी, अभिनेत्री तमन्ना आणि कियारा अडवाणी आणि हिंदुजा ग्रुपचे उद्योगपती गोपीचंद हिंदुजा हे सर्वजण सिंधी आहेत.

हैदराबादमध्ये त्यांच्या नावाने एक वसाहत देखील आहे.

मुंबईतल्या कराची बेकरीवरूनही वाद

2021 च्या सुरुवातीला मुंबईतील कराची बेकरीच्या शाखेवरून वाद झाला होता. मनसेच्या कार्यकर्त्यांनी या नावाला विरोध केला होता.

मुंबईतील वांद्रे येथील कराची बेकरी कोव्हिडची साथ आणि आर्थिक फटक्यामुळे तात्पुरती बंद करण्यात आल्याचं बेकरीच्या मालकांकडून सांगण्यात आलं. पण बेकरीच्या नावाच्या वादामुळे ती बंद करण्यात आली होती, अशीही झाली होती.

तेव्हा या घटनेनंतर बेकरीच्या मालकांकडून निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं होतं.

PTI ला दिलेल्या माहितीनुसार, सध्याचे बेकरीचे मालक राजेश रामनानी म्हणतात, "माझ्या आजोबांनी ही बेकरी सुरू केली. ते पाकिस्तानहून आले होते. त्यांनी प्रेमापोटी बेकरीला ते नाव दिलं. आम्ही अस्सल भारतीय आहोत. तेलंगाना पोलीस आणि सरकारला आमची विनंती आहे की, त्यांनी आम्हाला हे नाव न बदलण्यासाठी पाठिंबा द्यावा."

Haji saif shaikh मार्च 2021मध्ये कराची बेकरीनं मुंबईतली आपली शाखा बंद केली

"कराची हा शब्द फक्त आपल्या जन्मस्थळाशी संबंधित आहे. सध्याच्या वादाशी याचा काहीही संबंध नाही. ही पूर्णपणे भारतीय कंपनी आहे," असंही कंपनीने 2021 मध्ये म्हटलं होतं.

दरम्यान, रामनानी यांनी बेकरीचं नाव बदलण्याचा कोणताही विचार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत बेकरीचं नाव बदलण्याची कोणतीही योजना नसल्याचं त्यांनी सांगितलं.

कराची बेकरीच्या नावाच्या वादावरून सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

यामध्ये नाव बदलण्याची मागणी करणारे फार कमी दिसत आहेत. तर बेकरीला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

या घटनेशी आमचा संबंध नाही - भाजप

दरम्यान, भाजपने मात्र या घटनेपासून हात झटकले आहेत.

काही लोकांनी अज्ञानातून हा प्रकार केला असावा, पक्षाशी याचा काहीही संबंध नाही. हल्लेखोरांना आम्ही ओळखतही नाही, असं तेलंगाना भाजपचे प्रवक्ते पोरेड्डी किशोर रेड्डी यांनी बीबीसीला सांगितलं.

"सध्या लोकांच्या भावना उफाळून येत आहेत. त्यामध्ये काहींना कराची बेकरी आणि पाकिस्तान यांच्यात संबंध वाटला असावा. पण हा सगळा प्रकार त्यांच्या अज्ञानातून घडला असावा.

"आम्ही या कृतीचं कोणतंही समर्थन करत नाही. कराची बेकरी ही भारतातील हैदराबादी आणि सिंधी लोकांची आहे. सध्या आम्हाला लोकांच्या भावनेपेक्षा देशाची एकता जास्त महत्त्वाची आहे, असं रेड्डी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.