नाशिक- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय मंडळांमार्फत आयोजित केलेल्या इयत्ता दहावीचा निकाल मंगळवारी (ता.१३) दुपारी एकला ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीच्या निकालाची विद्यार्थी, पालकांना प्रतीक्षा होती. आता अधिकृत तारखेची घोषणा झाल्याने ही प्रतीक्षा संपली आहे.
शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण अशा नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये परीक्षा घेतली होती. या परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर मंगळवारी (ता.१३) दुपारी एकला ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे.
निकालानंतर दहावी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मुयांकनासाठी विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी बुधवार (ता.१४) ते २८ मे या दरम्यान अर्ज करता येईल. शुल्कदेखील ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहे.
पुनर्मुल्यांकनासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मंडळाच्या संकेतस्थळावर करावे. त्यासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून, छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामकाजाच्या पाच दिवसांत पुनर्मुल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करावा. जून-जुलैमध्ये होणार्या दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया गुरुवार (ता.१५) पासून सुरु होणार आहे.
येथे पहा निकाल...
- https://results.digilocker.gov.in
- https://sscresult.mahahsscboard.in
- https://sscresult.mkcl.org