पुणे - शिकण्याच्या वयात खांद्यावरचे दप्तर उतरले व घराची जबाबदारी आली. मग ‘घर एके घर’ म्हणत संसाराचा गाडा ओढत राहिलो. पण शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागले याची सल मनात होती. शेवटी निश्चय केला व स्वप्नपूर्तीसाठी हातात पुस्तके घेतली.
घरचे व जवळच्या सर्वांनी साथ दिली आणि २० ते २५ वर्षांनी का होईना दहावी व्हायचे स्वप्न पूर्ण केले. आपल्या यशाबद्दल सांगताना अनेक सावित्रीच्या लेकींच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसत होते. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यात पुणे नाईट स्कूलचा मोलाचा हातभार आहे.
सीमा ओव्हाळ (वय ४१) तब्बल २५ वर्षांनी सरस्वती पूना हायस्कूल येथून दहावी उत्तीर्ण झाल्या आहेत. ओव्हाळ म्हणाल्या, ‘परीक्षेच्या काळात वडिलांच्या आजारपणामुळे तसेच घरातील आर्थिक परिस्थिती फारशी ठीक नसल्याने दहावीचे आणि पुढील शिक्षण मला पूर्ण करता आले नाही, ही हुरहूर कायमच मनात होती.
घरातील जबाबदारी घेण्यासाठी मी नर्सिंगचा कोर्स केला आणि लगेच पाटणकर रुग्णालयात रुजू झाले. पण हे करता-करता जाणवलं की पैसा येतोय पण शिक्षण अजूनही राहिलेच आहे. लग्न झालं, दोन मुलं झाली. आयुष्य खूप पुढे निघून गेलेलं.
पण अर्धवट शिक्षण असल्याने दुसरीकडे कुठेही जॉब मिळत नव्हता. त्यामुळे जिद्द धरली आणि काम करत करत नाईट स्कूलच्या माध्यमातून मी अभ्यास केला आणि हे सगळं शक्य झालं. या सगळ्यात माझ्या मुलांनी, घरच्यांनी मला खूप आधार आणि आत्मविश्वास दिला.’
ताई सोपान सपकाळ यादेखील शाळेतून तिसऱ्या आल्या आहेत. दांडेकर पूल येथे त्या राहत असून कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता करणे, तसेच भाजी विकणे ही कामे त्या करत आहेत. हे काम करत-करत शिकण्याची जिद्द आणि आवड जपत त्यादेखील तब्बल २० वर्षांनी उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांना मुलगा व मुलगी आहे. पती नसल्याने घरातील सर्व जबाबदाऱ्या, बाहेरील काम आणि शिक्षण हे त्यांनी हिमतीने पूर्ण केले.
पुणे नाईट स्कूलचा निकाल ८९.४८ टक्के लागला आहे. ही संस्था महाराष्ट्रातील पहिली शाळा जी १०४ वर्षे कार्यरत आहे. जिथे आठवीपासून ते एम-कॉमपर्यंत शिक्षण मिळते. तसेच सरकारचे विविध अभ्यासक्रमदेखील उपलब्ध आहेत, अशी माहिती शाळेचे प्रमुख सतीश वाघमारे यांनी दिली.