सोलापूर : आश्वासनाप्रमाणे प्रशासनाने सीना नदीत पाणी न सोडल्याने सत्ताधारी भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनाच मंगळवारी (ता. १३) सिंचन भवनासमोर धरणे आंदोलन करावे लागले. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी लवकरच पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर देशमुख यांचे आंदोलन मागे घेण्यात आले.
सीना नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे नदीकाठ परिसरातील शेतकऱ्यांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शिवणी, पाकणी, तिऱ्हे, पाथरी, वडकबाळ, होनमुर्गी, राजूर, मोहोळ तालुक्यातील शिरापूर, टाकळी, शिंगोली, तरटगाव या सीना नदीकाठच्या गावांतील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी पाण्यासाठी पाच मे रोजी सिंचन भवनासमोर ठिय्या आंदोलन केले होते.
तेव्हा प्रशासनाने त्यांना १२ मे रोजी कुरुल शाखा कालव्यातून महादेव ओढ्यामार्गे सीना नदीत पाणी सोडण्याचे आश्वासन दिले होते. तसेच आमदार देशमुख यांनी अधीक्षक अभियंत्यांना पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु प्रशासनाने आश्वासन न पाळल्याने सत्ताधारी भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांना मंगळवारी सकाळी धरणे आंदोलन करावे लागले. यापूर्वीही त्यांना याप्रश्नी आंदोलन करावे लागले होते. सीना कोळेगाव धरणातून सीनेत पाणी सोडेपर्यंत आंदोलन न थांबवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. तसेच प्रशासनाविरोधात जोरदार घोषणा दिल्या.
त्यानंतर आमदार देशमुख यांनी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याशी चर्चा केली. त्यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर लवकरच पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. यावेळी अशोक कांबळे, राम जाधव, प्रा. विजयकुमार बिराजदार, विशाल जाधव, संजय वाघमोडे, विशाल जाधव, भागवत लामतुरे, सुरेश तेली, शामराव हांडे, अप्पासाहेब मोटे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
पूर्वी सीनेत शिरापूरपर्यंत पाणी सोडले जात होते. त्याच्या खालच्या भागाला पाणी सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीने घेतला आहे. परंतु त्यानुसार पाणी मिळत नाही. शिरापूरच्या खालच्या भागालाही पाणी मिळावे, ही आमची मागणी आहे. त्यातील अडचणी प्रशासनाने सांगितल्यास त्या सोडवल्या जातील. सोलापूरला २० ते २५ टीएमसी पाणी सोडावे लागत होते. आता दुहेरी जलवाहिनीमुळे केवळ पाच टीएमसी पाणी लागेल. उर्वरित पाणी सीनेला मिळू शकेल. पण यावर्षी त्रास सहन करावा लागत आहे. तो दूर व्हायला हवा.
- सुभाष देशमुख, आमदार, सोलापूर दक्षिण