उरुळी कांचन - वाहतूक नियंत्रण विभागाचे कर्तव्यावरील पोलिस अंमलदार मिथून धेंडे यांचा मंगळवारी (ता. १३) रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर छत्रपती संभाजी महाराज चौकात चाकण फाट्यावर ट्रकने चिरडल्याने मृत्यू झाला.
उरुळी कांचन येथील स्मशानभूमीत पुणे ग्रामीणच्या पोलिस जवानांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, पोलिस उपअधीक्षक दिलीप शिंदे, वडगाव मावळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार कदम, उरुळी कांचन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर पाटील, सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, शीतलकुमार डोईजड, माजी सरपंच अमित (बाबा) कांचन, जिल्हा पोलिस ग्रामीण दलातील पोलीस कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
३९ वर्षीय मिथुन धेंडे हे मूळचे उरुळी कांचन येथील रहिवासी आहेत. यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच १४ मे रोजी धेंडे यांचा वाढदिवस होता. वडगाव मावळ पोलिस ठाण्यात ते कार्यरत होते. पोलिस नाकाबंदी सुरु असताना ही दुर्देवी घटना घडली. या घटनेनंतर ट्रकचालक चाकण एमआयडीसीतील वाहनतळावर ट्रक पार्किंग करुन फरार झाला.
बॅरिकेड लावण्याचा इशारा देताच...
११२ आपत्कालीन क्रमांकावरून एक ट्रकचालक मुंबई-पुणे महामार्गावरून बेधडक गाडी चालवत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे वडगाव मावळ पोलिसांकडून तत्काळ चाकण फाट्यावर नाकाबंदी लावून वाहनांची तपासणी चालू होती.
एचआर-७४ बी-३६७७ क्रमांकाचा ट्रक समोरून येताच वाहतूक नियंत्रण विभागाचे कर्तव्यावरील पोलिस अंमलदार मिथून धेंडे आणि वाहतूक सहायक सुतार यांनी तो ट्रक अडवून गाडीचे इंजिन बंद केले. आणि धेंडे यांनी लगेच बॅरिकेड लावण्याचा इशारा दिला.
हे पाहून ट्रकचालकाने अचानक ट्रक चालू करुन चाकण दिशेने वेगाने वळवला. त्यात समोर उभे असलेले मिथून धेंडे यांच्या पोटावरुन ट्रकचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले.