'अनंत' ऊर्जा
esakal May 15, 2025 08:45 AM

कधी कधी काही माणसांचा आपल्या आयुष्यावर इतका प्रभाव असतो, की ती माणसं निघून गेल्यावर एक कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण होते... माझी आणि त्यांची मैत्रीही अशीच... त्यांच्या जाण्याने मी माझा ‘सॅंटा’ गमावला...

ही गोष्ट २००६ मधली. मी बीएमएमच्या दुसऱ्या वर्षाला असताना प्रभात चित्र मंडळातर्फे काही निवडक मुलांना माटुंग्याच्या रुईया कॅालेजला एका चित्रपट महोत्सवासाठी नेलं होतं. सकाळी लवकर घर सोडलं होतं, त्यामुळे झोप अनावर झाली होती.

ॲाडिटोरीयमचे लाईट घालवल्यावर मी डाराडूर झोपले.. तिथे सत्यजीत रे, मजिद माजिदी इत्यादी दिग्दर्शकांचे जागतिक दर्जाचे गाजलेले सिनेमे दाखवले जात होते.. जे मी बघणं खूप गरजेचं होतं! पण मी ताणून दिली. दुपारी जेवणाचा ब्रेक झाला आणि मी ताट हातात घेऊन खुशाल लाईनमध्ये उभी राहिले.

तेवढ्यात मला एका भारदस्त आवाजात ‘काय मग, झोप छान झाली का?’ असा प्रश्न विचारला गेला. मी दोन सेकंद मागे बघू की नको या संभ्रमात होते. तेवढ्यात ते माझ्यासमोर येऊन उभे राहिले आणि मनमोकळं हसले. खादीचा कुडता, खांद्यावर शबनम, सांताक्लॅाजसारखा हसरा, प्रसन्न चेहरा आणि टायटॅनिकमधल्या कॅप्टनसारखी पांढरी शुभ्र दाढी.

वय जवळजवळ ६५-७०. मला म्हणाले, ‘नीट जेव हो, दुपारची झोप खूपच भारी. सिनेमे काय नंतरही बघशील... पण झोप महत्त्वाची!’ हे ऐकल्यावर तर मला तोंड कुठे लपवू असं झालं होतं. मी काही बोलणार तोच त्यांनी त्यांचं नाव सांगितलं... ‘मी अनंत भावे.

जेवण झाल्यावर मी पुन्हा झोपले; पण या वेळी भावे सर कुठे बसलेत हे बघून त्यांना मी दिसणार नाही अशा प्रकारे खुर्चीत पार खाली घसरून झोपले. सहाचा ब्रेक झाला आणि मी स्वतः त्यांना जाऊन भेटले. त्यांना माझं नाव सांगितलं. मी कर्जतवरून आलेय.. पहाटेची ट्रेन पकडून आले इत्यादी.. म्हणून झोप येतेय असं सांगत असताना ते मला म्हणाले, ‘ठीके गं! झोप आली तर आली. छान झोप तर झाली ना. मला आवडलीस तू.’ तो दिवस संपला आणि मी घरी जाऊन आईला सांगितला हा सगळा किस्सा. आईनं मला ‘अनंत भावे’ कोण आहेत हे सांगितलं... आणि मी उडाले!

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मी स्वतः त्यांना जाऊन भेटले. त्यांच्याशी बोलले आणि महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी भावे सरांचे भावेकाका कधी झाले मला कळलंच नाही. मग आम्ही अगदी वरचेवर फोनवर बोलायला लागलो.

माझ्या आयुष्यात भावेकाकांच्या रूपानं एक खूपच ‘तरुण’, दिलखुलास जगणारा, समोरच्याला वेळोवेळी ‘पावर’(ऊर्जा) देणारा मित्र आला.. पुढे हा मित्र माझा ‘गाईड’

झाला. गेली वीस वर्षं काका मला नेहमी कॅाल करायचे, मी काय करतेय हे जाणून घ्यायचे. माझ्याशी बोलताना माझ्या वयाचे व्हायचे. मी त्यांच्यावर चिडायचे, त्यांच्याकडे रडायचे, त्यांच्याशी माझ्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी शेअर करायचे.

त्यांच्या घरी गेले, की नेहमी पिशवीभर पुस्तकं मला भेट द्यायचे. पुष्पाताई कसं गटगटे बोंबिल करतात ते हौसेनं सांगायचे. पुष्पाताईंवर त्यांचा खूप जीव. त्यांना मुलबाळ नाही; पण आम्हीच सगळी कशी त्यांची मुलं हे सांगून हसायचे. मी हक्कानं त्यांना ओरडायचे, काळजी घ्यायला सांगायचे. त्यांनी माझ्याशी व्हिडियो कॅालवर बोलायला हवं म्हणून स्मार्टफोन घ्यायला सांगायचे.

त्यांच्या त्या भारदस्त आवाजात वेगळीच माया होती. वेळ पडली, की ते माझे आजोबा व्हायचे. मी शूटमध्ये बिझी असेन म्हणून माझ्या आईला फोन करून माझी चौकशी करायचे. नंतर पुष्पाताई गेल्या आणि माझा हा गोड मित्र एकटा पडला. रोज चांगलंचुगलं खाणारा हा मित्र पुष्पाताईंच्या हातचं जेवण मिस करायचा. त्यांचा सहवास मिस करायचा.

काही काळानं काका पुण्याला अथश्रीला राहायला गेले. तिथे ‘त्यांच्या’ वयाच्या माणसांमध्ये हळूहळू रुळले. मला मात्र आवर्जून खाऊ पाठवायला सांगायचे. बेकरीतले पदार्थ त्यांच्या खास आवडीचे. मग त्यांना मी केक, खारी, टोस्ट, बन अशा अनेक गोष्टी पाठवायचे. खाऊ मिळाल्यावर लहान मूल जसं खूश होतं, तसे ते खूश होऊन मला कॅाल करायचे. हळूहळू मी खूप बिझी होत गेले.

काकाही अधूनमधून अजारी पडायला लागले. ते विसरायलाही लागले होते; पण मला कॅाल नक्की करायचे. दर ख्रिसमसला माझा सॅंटा मला खूप ‘पावर’ पाठवायचा! आणि मला ती मिळायचीही. त्यांना मी मजेत चिडवायचे, की तुम्ही माझे सगळ्यात लहान मित्र आहात. २३ फेब्रुवारी २०२५ ला सकाळी पोस्ट बघून मला कळलं, की माझा सॅंटा मला सोडून गेलाय.. कायमचा.

त्या क्षणी सगळं थांबल्यासारखं झालं. आता त्यांचा कॅाल परत कधीच येणार नाहीये. त्यांचं ते दिलखुलास हसणं परत कधीच ऐकू येणार नाही आणि त्यांच्याकडून ‘पावर’ही कधीच मिळणार नाहीये... पण त्यांच्या आठवणी नेहमी मनाच्या त्या कोपऱ्यात राहतील- जिथं फार कोणी पोहोचू शकत नाही... आणि मनाला एकच आनंद राहील, की हे लहान बाळ पुन्हा पुष्पाताईंना भेटून आनंदात असेल...

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.