पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि ऑलराउंडर शाहिद आफ्रिदी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव सुरु असताना आफ्रिदीने अकलेचे तारे तोडले. आफ्रिदीने दोन्ही देशातील युद्धविराम जाहीर झाल्यानंतरही मुर्खपणा सुरुच ठेवला आहे. त्यामुळे आफ्रिदीची सोशल मीडियावर लाज काढली जात आहे. भारतीय सैन्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानवर जोरदार कारवाई केली. भारतीय सैन्याच्या या कारवाईत पाकिस्तानचा सुपडा साफ झाला. त्यानंतरही आफ्रीदीने पाकिस्तानमध्ये विजय यात्रा काढली. भारताने पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला परतवून लावला. पाकिस्तानचे मनसुबे उधळवून लावले. मात्र त्यानंतरही आफ्रिदीला पाकिस्तानला विजय मिळवल्यासारखं वाटतंय. त्यामुळे आफ्रिदी मस्करीचा विषय झाला आहे.
शाहिद आफ्रिदीने कायम भारताविरोधात विधानं केली आहेत. तसेच भारतावर अनेक आरोप केले आहेत. आफ्रिदीला याचे परिणामही भोगावे लागले आहेत. मात्र त्यानंतरही आफ्रिदीची मस्ती जिरत नाहीय. आफ्रिदीने पुन्हा एकदा भारतावर गंभीर आरोप केला आहे.
शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानच्या विकासात भारत आडकाठी करत असल्याचा आरोप केला. “भारत विकास करत आहे. भारताच्या विकासामुळे आम्ही आनंदी आहोत. भारतीय क्रिकेटही पुढे जात आहे, ही चांगली बाब आहे. मात्र आम्ही पुढे जातोय तर आम्हाला रोखलं जातंय. हे काय शेजाऱ्याचं काम आहे”, असं म्हणत आफ्रिदीने अकलेचे तारे तोडले.
आफ्रिदीनुसार, भारत पाकिस्तानला प्रगती करण्यापासून रोखतोय. मात्र पाकिस्तानमधील लोकं त्यांच्या देशाचे शत्रू आहेत, याचा आफ्रिदीला सोयीस्कररित्या विसर पडलेला दिसतोय. पीसीबी अर्थात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष बदलताच क्रिकेट टीमचा कर्णधार बदलला जातो. राजकारणामुळे पाकिस्तान क्रिकेट आणि देशाचं नुकसान झालं आहे,हे जगजाहीर आहे.
शाहीद आफ्रिदी कायम भारताबद्दल गरळ ओकत असतो. त्यामुळे भारतीयांची तळपायाची आग मस्तकात जाते. शाहिद आफ्रिदीकडून भारतीय सैन्याचं द्वेष करण्यामागे कारण आहे. भारतीय सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफकडून आफ्रिदीच्या चुलत भावाला काही वर्षांपूर्वी गोळ्या घातल्या होत्या.
बीएसएफने अनंतनागमध्ये 2003 साली झालेल्या चकमकीत आफ्रिदीच्या भावाला ठार केलं होतं. आफ्रिदीच्या भावाचं शाकीब असं नाव होतं. शाकीब हरकत-उल-अंसार बटालियन असल्याचं सांगितलं गेलं होतं. बीएसएफने शाकिबकडून काही कागदपत्र जप्त केले होते. त्याआधारे शाकीब हा आफ्रिदीचा भाऊ असल्याचं सिद्ध झालं होतं. मात्र तेव्हा आफ्रिदीने शाहीद हा आपला भाऊ नसल्याचं म्हटलं होतं.