आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघापैकी एक असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सची 18 व्या मोसमात निराशाजनक कामगिरी राहिली. चेन्नई 18 व्या मोसमातून बाहेर पडणारी पहिली टीम ठरली. चेन्नईला आतापर्यंत 12 पैकी फक्त 3 सामन्यांमध्ये विजय मिळवता आला. तर चेन्नईला 9 वेळा पराभवाचा सामना करावा लागला. तसेच चेन्नईने यंदा काही खेळाडूंना संधीही दिली. त्यापैकी एक म्हणजे 17 वर्षीय आयुष म्हात्रे. मुंबईच्या या युवा ऑलराउंडरने पदार्पणातील सामन्यातच आपली छाप सोडली.
आयुषने घरच्या मैदानात अर्थात वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध पदार्पणात 15 बॉलमध्ये 32 रन्स केल्या. आयुषने या संधीचं सोनं केलं. त्यानंतर आता एका मुलाखतीत आपल्याला कशाप्रकारे सूर्यकुमार यादवमुळे चेन्नईकडून खेळण्याची संधी मिळाली? आयुषने याबाबत मुलाखतीत सांगितलं. सीएसकेकडून आयुषच्या मुलाखतीचा व्हीडिओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे. आयुषने या मुलाखतीत त्याला संधी कशी मिळाली? याबाबत सविस्तर सांगितलंय.
“सीएसकेकडून कधीही कॉल येऊ शकतो, असं मला सूर्या भाईने (सूर्यकुमार) सांगितलेलं. त्यानंतर मी स्वत: ला मानसिकरित्या तयार केलं होतं. त्यानंतर मला श्रीकांत सरांचा फोन आला. तुला 2 दिवसांसाठी यावं लागेल. तुझा खेळ मला पाहायचाय, असं श्रीकांत सरांनी मला कॉलवर सांगितलं. त्यानंतर मी टीमचा भाग होण्यासाठी फार उत्साही होतो. तसेच मी ट्रायल देण्यासाठी पूर्णपणे तयार होतो”, असं आयुषने सांगितलं.
आयुष सूर्याबाबत काय म्हणाला?
आयुषने या मुलाखतीत सूर्युकमार यादव याचे जाहीर आभार मानले. मी विजय हजारे ट्रॉफी दरम्यान सूर्यकुमारसह फार वेळ घालवला. त्यांनी मला पाठींबा दिला. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला”, असं आयुषने सूर्यकुमार बद्दल म्हटलं. तसेच “2-3 डावात चांगलं खेळता आलं नाही तरीही आत्मविश्वास कायम ठेव, ज्यामुळे मैदानात कोणत्याही प्रकारे दबाव दिसून येणार नाही”, असा कानमंत्रही सूर्यकुमारने दिल्याचं आयुषने सांगितलं.
दरम्यान आयुषने आयपीएलच्या 18 मोसमात आतापर्यंत एकूण 5 सामने खेळले आहेत. आयुषने या 5 सामन्यांमध्ये 32.6 च्या सरासरीने आणि 181.12 अशा स्ट्राईक रेटने एकूण 163 धावा केल्या आहेत. आयुषची 94 ही सर्वोच्च खेळी आहे. आयुषने आरसीबी विरुद्ध ही खेळी केली होती.