गुंतवणुकीच्या नावाने गंडा; तिघांना अटक
अंधेरी, ता. १५ ः गुंतवणुकीच्या नावाने गंडा घालणाऱ्या एका ज्वेलर्स व्यापाऱ्यासह तिघांना दिंडोशी पोलिसांनी अटक केली. कुशल दलपतसिंग राठोड ऊर्फ कमलेश चौहाण, विनायक माने, सिबाराम सावंत, अशी या तिघांची नावे आहेत. तिघेही सध्या पोलिस कोठडीत आहेत.
सोन्यासह रोकड घेऊन तिघांनी पलायन केले होते. कुशल राठोड हा ज्वेलर्स व्यापारी असून, त्याने गोरेगाव परिसरात एक ज्वेलर्स दुकान घेतले होते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्याने वेगवेगळ्या योजना सुरू केल्या होत्या. यामध्ये अनेकांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोकड स्वरूपात गुंतवणूक केली होती. दोन वर्षांत त्याच्याकडे ९० हून अधिक लोकांनी सुमारे चार कोटींची गुंतवणूक केली होती. मात्र कोणालाही काहीही परतावा न देता कुशल राठोड दुकानाला टाळे लावून पळून गेला होता. हा प्रकार उघडकीस येताच गुंतवणूकदारांनी दिंडोशी पोलिसांत तक्रार केली होती. शोधमोहीम सुरू असताना राजस्थानातून कुशल राठोडला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यात त्याला विनायक माने आणि सिबाराम सावंत यांनी मदत केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते.