फुगाळे गावच्या जंगलात ड्रोन
शहापूर, ता. १५ (वार्ताहर) : शहापूर तालुक्यातील कसारा भागातील फुगाळे गावच्या जंगलात गुरुवारी (ता. १५) दुपारी ड्रोन आढळला; परंतु कसारा पोलिसांच्या चौकशीत हा ड्रोन जलसंपदा विभागाचा असून, तो सर्वेक्षणासाठी वापरण्यात आल्याचे निष्पन्न झाले. जलसंपदा विभागाकडून वैतरणा नदीक्षेत्रात मागील काही दिवसांपासून सर्वेक्षणासाठी या ड्रोनचा वापर करण्यात आला होता; मात्र हा ड्रोन हवेत भरकटत फुगाळे गावात पडला. पोलिसांनी याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देताच तेदेखील घटनास्थळी दाखल झाले. अखेरीस पडलेला ड्रोन जलसंपदा विभागाचा निघाल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.
दरम्यान, याप्रकरणी जलसंपदा विभागाने हवेत ड्रोन उडविण्याच्या परवानग्या घेतल्या आहेत का, भारत-पाक युद्ध सुरू होते त्या काळात ड्रोन उडविण्यात आले होते का? याची खातरजमा करण्यात येणार असल्याचे कसारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश गावित यांनी ‘सकाळ’ला सांगितले.