पुणे - मटणाची सहा मोठ्या आकाराची हाडे अन्ननलिकेत अडकलेल्या बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग ५२ वर्षीय रुग्णावर ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया केली. रुग्ण सध्या सुखरूप असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
कोल्हापूर येथील या रुग्णाला जेवताना मटणाचा घास नीट चावता न आल्याने घशात मटणाचे हाड अडकले. त्यामुळे त्याला उलट्या, घशात दुखणे व अन्न-पाणी गिळताना त्रास होऊ लागला. स्थानिक रुग्णालयात उपचार न होऊ शकल्याने रुग्णाला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यानंतर ससून रुग्णालयाच्या कान, नाक व घसा शास्त्र विभागात तातडीने उपचार सुरू करण्यात आले. सीटी स्कॅनमध्ये अन्ननलिकेच्या वरच्या भागात सहा हाडे अडकली असल्याचे निष्पन्न झाले. हाडांची संख्या व विविध आकार पाहता शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती.
प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ. राहुल तेलंग, तसेच डॉ. राहुल ठाकूर, डॉ. प्रणीत खंडागळे, डॉ. आकृती नेमाणी, डॉ. प्रियांका शिंदे व इतर डॉक्टरांच्या सहकार्याने दुर्बिणीद्वारे ‘ईसोफॅगोस्कॉपी’ करून यशस्वीपणे हाडे बाहेर काढली.
या प्रक्रियेत भूलतज्ज्ञ डॉ. सुरेखा शिंदे, डॉ. विजय पाटील, डॉ. श्रीमाल प्रसाद, तसेच परिचारिका दमयंती जाधव यांचे विशेष योगदान लाभले. शस्त्रक्रियेसाठी लागणारी यंत्रणा व सुविधा तत्काळ उपलब्ध करून दिल्याबद्दल ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार आणि अधीक्षक डॉ. यलप्पा जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर आहे.