पुणे - नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) गुरुवारी अरबी समुद्रात दाखल झाले आहेत. मालदीवच्या काही भागासह श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत मॉन्सूनने प्रगती केल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. अंदमान बेटे आणि बंगालच्या उपसागरातही मॉन्सूनने चाल केली आहे. मॉन्सूनचा प्रवास वेगाने होत असून, २७ मे पर्यंत तो केरळमध्ये पोहोचण्याची चिन्हे आहेत.
यंदा सर्वसाधारण वेळेच्या तब्बल पाच दिवस आधीच १३ मे रोजी मॉन्सून दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात दाखल झाला. त्यानंतर मॉन्सूनची वाटचाल सुरूच असून, गुरुवारी मॉन्सूनने दक्षिण अरबी समुद्रासह मालदीव आणि भारत आणि श्रीलंकेचा कोमोरिन भाग व दक्षिण किनारपट्टी पर्यंत मजल मारली.
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान असल्याने पुढील दोन ते तीन दिवसांत अरबी समुद्र, मालदीव, कोमोरीन, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागासह संपूर्ण अंदमान बेटांवर मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे.