Shehbaz Sharif: आता काश्मीरच्या वादावर कायमचा तोडगा निघणार? भारतासोबत शांतता चर्चेसाठी पाकिस्तानच्या पंतप्रधानांची संमती
esakal May 16, 2025 05:45 AM

Shehbaz Sharif: पाकिस्तानसोबतचा सध्याचा संघर्षाचा काळ भारताच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. कारण काश्मीरच्या वादावर यामुळं तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे. याला कारण ठरलंय पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं एक विधान. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी गुरुवारी सांगितलं की भारतासोबत शांतता चर्चेत सहभागी होण्यास आपण तयार आहोत. यामध्ये काश्मीर वाद आणि पाणी वाटप यांसह द्विपक्षीय मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी भारताला व्यापक चर्चेसाठी त्यांनी आमंत्रित केलं आहे.

पाकिस्तानी पंतप्रधानांचं हे ताजे वक्तव्य भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी १८ मे पर्यंत वाढवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर आलं आहे. पाकिस्तानकडूनच याबाबत दावा करण्यात आला आहे, भारतानं यात अद्याप कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. पाकिस्तानचे उपपंतप्रधान (डीपीएम) इशाक दार यांनी गुरुवारी सांगितलं की, पाकिस्तान आणि भारताच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (डीजीएमओ) युद्धबंदीवर चर्चा करण्यासाठी हॉटलाइनवर चर्चा केली आणि ही युद्धबंदी १८ मे पर्यंत वाढवण्यात आली आहे.

दरम्यान, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आदल्या दिवशी सांगितलं की, भारताचे पाकिस्तानशी संबंध आणि व्यवहार पूर्णपणे द्विपक्षीय असतील, जे अनेक वर्षांपासून एक राष्ट्रीय सहमती आहे. तसंच त्या सहमतीत कोणताही बदल झालेला नाही. जोपर्यंत पाकिस्तान विश्वासार्हपणे सीमेपलीकडून दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू जल करार स्थगित राहील. चार दिवसांच्या सीमेपलीकडून होणाऱ्या तीव्र ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर भारत आणि पाकिस्ताननं १० मे रोजी संघर्ष संपवण्यासाठी एक सामंजस्य करार केला.

जम्मू आणि काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या पहलगाम इथं २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. दहशतवाद्यांनी पर्यटकांना टार्गेट करत २६ जणांना ठार केलं होतं. त्यानंतर ७ मे रोजी सकाळी भारतानं 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्ताननं ८, ९ आणि १० मे रोजी भारतीय लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्याने अनेक पाकिस्तानी लष्करी तळांवर जोरदार प्रत्युत्तर दिलं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.