वडमुखवाडीतील संत ज्ञानेश्वर सृष्टीची दुर्दशा
esakal May 18, 2025 02:45 AM

संजय बेंडे ः सकाळ वृत्तसेवा
भोसरी, ता. १७ ः संत परंपरा आणि वारकरी संप्रदायाची नागरिकांना माहिती देण्यासाठी वडमुखवाडीत संत ज्ञानेश्वर सृष्टीची उभारणी पिंपरी चिंचवड महापालिकेद्वारे करण्यात आली. गेल्या वर्षी तिचे काम पूर्ण झाले. मात्र, महापालिकेच्या दुर्लक्षाने उद्घाटनापूर्वीच तिची दुरवस्था झाली आहे. आषाढी वारीपूर्वी तिची आवश्यक देखभाल दुरुस्ती करुन तिचे उद्घाटन करण्याची मागणी वारकरी आणि नागरिकांमधून होत आहे.
वडमुखवाडीत संत नामदेव महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज भेटीचे समूह शिल्प आणि संत ज्ञानेश्वर सृष्टीची निविदा प्रक्रिया २०१४ मध्ये काढण्यात आली. २०१५ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली. त्यानंतर संथगतीने सुरू झालेले काम या - ना त्या कारणाने रखडले. हे काम २०२४ मध्ये महापालिकेद्वारे पूर्ण करण्यात आले. मात्र, महापालिकेच्या दुर्लक्षाने त्याची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी पाण्याअभावी लॉन्स सुकले आहेत. जागोजागी उंच आणि खोलगट भाग तयार झाले आहेत. त्याचप्रमाणे जंगली गवत वाढले आहे. कचरा साचून धूळ पसरली आहे. ॲम्फी थिएटरच्या आसनाजवळील लॉन्सचीही दुरवस्था झाली आहे.
सृष्टीमध्ये ब्राँझ धातूमध्ये संतांची माहिती देणारी एकूण ४७ म्युरल्स उभारली आहेत. त्यामधून पालखी चाले पंढरी, तीर्थावली नामदेव-ज्ञानेश्वर विहिरीतील पाणी पिण्याचा प्रसंग, संत ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली, ज्ञानेश्वरी लेखन, निवृत्तीनाथांना गहिनीनाथ उपदेश करताना आदी प्रसंग साकारण्यात आले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या भेटीचे शिल्प उभारण्यात आले आहे. त्याजवळ २०० फूट उंचीची पताका (वारकरी झेंडा) उभारणीचे काम सुरू आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज सृष्टीचे काम पूर्ण झाल्याची माहिती महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क कार्यालयाला देण्यात आली आहे. त्यांच्याद्वारे संत ज्ञानेश्वर सृष्टीच्या उद्घाटनाबाबत पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. लॉन्सच्या दुरुस्ती, अस्वच्छता आणि इतर झालेली दुरवस्था उद्घाटनापूर्वी दूर करण्यात येईल.
- अमित चव्हाण, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ई क्षेत्रिय कार्यालय

संत ज्ञानेश्वर महाराज सृष्टीचे उद्घाटन महापालिकेने येत्या आषाढी वारीपूर्वी करावे. त्यामुळे स्थानिकांसह वारीसाठी लांबून येणाऱ्या भाविक आणि वारकऱ्यांना संत परंपरेची चांगल्या प्रकारे माहिती मिळेल. वारकऱ्यांना तेथे विसाव्याचाही क्षण घेता येईल.
- अॅड. विष्णू तापकीर, अध्यक्ष, श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्ट, वडमुखवाडी


BHS25B02895, HS25B02896

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.