ठाणे : मुंबई, ठाण्यातून नाशिकला जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. ईस्टर्न एक्सप्रेसवरील कॅडबरी येथे मेट्रो स्टेशनवर छत टाकण्यात येणार आहे. यामुळे कॉलम उभे करुन त्यावर जॅक बिम टाकण्यात येणार आहेत. त्यानंतर जॅक बिमवर राफ्टर उभारण्यात येणार आहेत. या कामासाठी वाहतुकीत शुक्रवारपासून बदल करण्यात येणार आहे.
ठाण्यातील कॅडबरी मेट्रो स्टेशनवर शुक्रवारपासून रात्री ११ वाजेपासून सकाळी ५ वाजेपर्यंत हे काम चालणार आहे. हे काम २५ मे रोजीपर्यंत केले जाणार आहे. त्यानुसार या कालावधीत वाहतूक बदल लागू असणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले. मेट्रो स्टेशनचे छत उभारण्याचे काम हे ६० टन मोबाइल क्रेनच्या सहाय्याने करण्यात येणार आहे.
कामासाठी लागणारी क्रेन मुंबई नाशिक वाहिनीवरील कॅडबरी उड्डाणपुलावर उभी करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरात वाहतुक कोंडी होऊ नये या उद्देशाने वाहतुक बदल करण्यात येणार आहे. त्यानुसार मुंबईकडून नितीन ओव्हर ब्रीजवरुन नाशिक आणि घोडबंदरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना नितिन ब्रीज चढणीच्या सुरवातीला दुभाजकाजवळ प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
या मार्गावरील सर्व प्रकारची वाहनेही नितीन ब्रीज चढणीच्या सुरवातीच्या दुभाजक येथील स्लीप रोडने नितीन कंपनी, जंक्शन-कॅडबरी जंक्शन येथून स्लीप रोडने कापूरबावडीवरुन इच्छीस्थळी जाऊ शकणार आहेत. मार्गातील वाहतूक बदल १६ ते २५ मे या कालावधीत रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत अंमलात असणार आहेत.