Eleventh Admission : अकरावी ऑनलाईन प्रवेश मान्यताप्राप्त महाविद्यालयांना लागू
esakal May 18, 2025 05:45 AM

पुणे - शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश घेण्यासाठीची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सध्या 'https://mahafyjcadmissions.in' या अधिकृत संकेतस्थळावर सुरू आहे. ही प्रवेश प्रक्रिया राज्यातील सर्व मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांसाठी लागू आहे, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने नमूद केले आहे.

राज्यात यंदा इयत्ता अकरावीसाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होत आहे. यासाठी राज्यभरातील एकूण नऊ हजार २८१ महाविद्यालयांनी यशस्वीरित्या नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली असून, संबंधित विभागीय उपसंचालक कार्यालयांमार्फत या नोंदणीची पडताळणी व प्रमाणन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेतील विविध सुविधा १९ मे पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

सर्व संबंधित महाविद्यालयांनी संबंधित संकेतस्थळावर माहिती गांभीर्याने नोंदवून, विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी तातडीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक आणि राज्यस्तरीय प्रवेश नियंत्रण समिती अध्यक्ष महेश पालकर यांनी केले आहे.

कनिष्ठ महाविद्यालयांची विभागनिहाय आकडेवारी :

विभाग : पडताळणी पूर्ण झालेली महाविद्यालये

अमरावती : १,४२२

छत्रपती संभाजीनगर : १,३२३

कोल्हापूर : ९३७

लातूर : ६२५

मुंबई : १,२६५

नागपूर : १,२७५

नाशिक : ९१३

पुणे : १,५२१

एकूण : ९,२८१

प्रवेश प्रक्रियेसंदर्भात महाविद्यालयांना तांत्रिक अडचण अथवा मार्गदर्शनाची संपर्क :

- हेल्पलाइन क्रमांक: ८५३०९५५५६४

- ई-मेल: - support@mahafyjcadmissions.in

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.