पालघरच्या विकासाला वेग
esakal May 18, 2025 06:45 AM

वसई, ता. १७ (बातमीदार)ः केंद्र आणि राज्याचे नवनवे प्रकल्प पालघरमध्ये सुरू आहेत. बुलेट ट्रेन, मेट्रो सुसाट धावणार असल्याने औद्योगिक वसाहत, नवे कारखाने, व्यवसाय, नोकरीची संधी चालून येणार आहे. त्यामुळे पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचे जीवनमान उंचावणार असून आगामी काळात जिल्ह्यातील आर्थिक उलाढालींमुळे पालघर जिल्हा विकासाला वेग येणार आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची केंद्राची संकल्पना प्रत्यक्षात उतरली आहे. मुंबई ते गुजरात राज्यात धावणारी ही ट्रेन पालघर जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. पालघरमध्येदेखील या मार्गावरील स्थानके निश्चित झाली आहेत. त्यामुळे मुंबई ते अहमदाबाद ५०८ किलोमीटरचे अंतर केवळ दोन तासांत गाठता येणार आहे. कमी वेळेत जास्त अंतर पार करणे सहज शक्य होणार असल्याने भविष्यात पर्यटन, रोजगार निर्मितीदेखील होणार आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनमुळे जिल्ह्याच्या विकासाला वेग येणार आहे. याचसोबत मुंबईतील पश्चिम-पूर्व उपनगर आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जाणारी मेट्रो लाइन नऊदेखील सुरू होणार आहे. वसई-विरार स्थानकामुळे प्रदूषणविरहीत तसेच अधिक आरामदायक प्रवास शक्य होणार आहे. त्यामुळे व्यवसायानिमित्त व्यापारी, कामगार वर्ग पालघरच्या दिशेने येणार असून महसुली उत्पन्न वाढणार असल्याने जिल्ह्याला नवीन दिशा मिळणार आहे.
-------------
रस्ते वाहतुकीचे जाळे
पालघरमध्ये मुंबई-बडोदा एक्स्प्रेस, वरळी ते विरार सी लिंकसह विविध प्रकल्प येत आहेत. विरारपर्यंतच्या विस्तारामुळे ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांना मेट्रोशी थेट जोडणी मिळेल. पालघर तसेच वसई-विरारसारख्या भागात अखंड प्रवास शक्य होणार आहे.
--------------------------------------
महामार्गावरील कोंडीला पर्याय
सागरी मार्गाने जिल्ह्यात जाळे निर्माण केले जाते. वसई- भाईंदर व विरार ते सफाळे फेरीबोट सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पालघरपर्यंत सागरी मार्गाचा वापरामुळे व्यवसाय, नोकरीसह अन्य कामांसाठी फायदा होणार असून महामार्गावरील कोंडी दूर होणार आहे. तसेच पर्यटनवाढीला, स्थानिक भूमिपुत्रांना व्यवसाय आणि स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध होणार आहेत.
----------------
उद्योगांसाठी सुवर्णसंधी
आंतरराष्ट्रीय प्रकल्प असलेल्या वाढवण बंदरामुळे लाखोंच्या संख्येने रोजगार निर्मिती होणार आहे. या बंदरामुळे विविध लहान-मोठे उद्योग सुरू होतील, तसेच हा प्रकल्प हरित भाग निर्मितीला चालना देणारा असणार आहे. त्यामुळे स्वयंरोजगारातून जिल्ह्याच्या विकासाचे दालन खुले होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.