- स्मिता देव, smitah37@gmail.com
आई बाळाचं इवलुसं बोट धरून त्याला पहिली छोटी छोटी पावलं टाकायला शिकवते. माझ्या आईनंही मी बाळ असताना असंच माझं बोट धरलं... आज माझ्या वयाच्या ५२ व्या वर्षीही मी अडखळू लागले, की ती लगेच मला आधार देते.
१५ ऑगस्ट २००७ चा दिवस माझ्या कायम लक्षात राहील. या दिवशी मला एक मानसिक समस्या असल्याचं निदान झालं. त्यानं माझ्या अनेक गोष्टी हिसकावून घेतल्या! माझा आत्मविश्वास, आनंद आणि अनेक नाती. एवढं पुरेसं नव्हतं म्हणून की काय, त्यामुळे माझ्या अनेक मित्रांमध्ये मी एक चर्चेचा विषयच झाले!
औषधोपचार आणि त्याबरोबर मानसिकदृष्ट्या पुन्हा उभं राहण्याची धडपड, यापुरतं माझं जग सीमित होऊन गेलं. या काळात माझी आई आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. विशाल सावंत या दोघांनी माझं बोट धरून लहान बाळासारखी मला पुन्हा पावलं टाकायला शिकवली.
त्यांनीच मला पुन्हा एकदा आत्मविश्वासानं माझ्या स्वयंपाकघरात प्रवेश करायला प्रोत्साहन दिलं... आणि आयुष्यात आनंद परत आल्याची जाणीव झाली. स्वयंपाक आणि लोकांना खाऊ घालणं मला पूर्वीसुद्धा आवडायचं; पण या काळात हे उमगलं, की स्वयंपाक करणं हीच आपल्यासाठी एक ‘थेरपी’ आहे!
आजाराच्या आणि उपचारांच्या संपूर्ण काळात मी अनेकदा निराश होऊन रडायचे. असा प्रश्न पडायचा, की का देव मला इतके भोग भोगायला लावतोय?... तेव्हा आईनं मला जे सांगितलं, ते कायम लक्षात राहिलं- ‘‘देवाला जो आवडतो ना, त्याच्याच नशिबी तो भोग लिहीतो... कारण त्याला माहिती असतं, की तुम्ही ते पचवण्याइतके भक्कम आहात.
तुम्ही हतबल होणार नाही, हेही माहितच असतं त्याला! तूपण यातून तरून जाशील... चार पावसाळे जास्त पाहिल्याचं शहाणपण येईल तुझ्यात.’ या शब्दांनीच मला खूप धीर आला. आपल्या सगळ्यांमध्ये जी एक प्रचंड शक्ती असते, त्याचा मी कधी असा विचारच केला नव्हता.
बोगद्याच्या शेवटी प्रकाश दिसतो म्हणतात ना, तसं वाईट दिवसांनंतर कधी तरी चांगले दिवसही येत असतात, ही जाणीव मला तिनं करून दिली. मी आज जे काही करतेय, त्याचं श्रेय आईला आणि डॉक्टरांना.
माझ्या खाद्यविश्वाबद्दल गेले काही महिने तुम्हाला सांगताना मला खूप आनंद वाटला. आज माझ्या या गप्पांना तात्पुरत्या स्वरूपात विराम देतेय. पण मनापासून स्वयंपाक करणं आवडणारी मंडळी आणि चवीनं खाणारी मंडळी, यांच्यात जो अदृश्य बंध असतो, तो नेहमी कायम राहतो. कधीही, कुठेही गप्पांची संधी मिळाली की अनुभवांची देवाणघेवाण होत गप्पा रंगतातच!
काहीच दिवसांपूर्वी ‘मदर्स डे’ होऊन गेला. त्या दिवशी समाजमाध्यमांवर आईचा गौरव करणाऱ्या पोस्ट सारख्या वाचायला मिळत होत्या. मला वाटतं, की असा कुठला एक नुसता प्रतीकात्मक दिवस न राहता, रोजचा दिवसच आईचा असावा! आज माझ्या आईच्या मला प्रचंड आवडणाऱ्या काही खास रेसिपी तुमच्यासाठी देतेय...
डाळीतोंय
साहित्य - १ कप तूरडाळ (धुवून तासभर भिजवलेली), अर्धा टीस्पून हळद, १ इंच आलं (बारीक चिरून), ३ हिरव्या मिरच्या (उभ्या चिरलेल्या), अर्धा कप कोथिंबीर (बारीक चिरून), मीठ, ३ टेबलस्पून नारळाचं तेल, अर्धा टीस्पून मोहरी, चिमूटभर हिंग, कढीलिंब, २ लाल मिरच्या (तुकडे करून).
कृती - तूरडाळीत हळद घालून शिजवा. शिजलेली डाळ डावाने चांगली घोटून घ्या. त्यातच हिरव्या मिरच्या, आलं आणि कोथिंबीर घाला. साधारण अर्धा कप पाणी घालून हवी तशी पातळ करून घ्या. चवीनुसार मीठ घालून मग डाळीला उकळी आणा. नारळाच्या तेलाची मोहरी, हिंग, कढीलिंब आणि लाल मिरच्या घालून फोडणी करून घ्या. ही फोडणी डाळीवर घाला आणि आच बंद करा. फोडणी घातल्यावर डाळीवर झाकण ठेवून २-३ मिनिटं फोडणीचा वास त्यात मुरू द्या. डाळीतोंय तयार!
बटाट्याच्या फोडी (काप)
साहित्य - अर्धा किलो बटाटे (जवळजवळ १ सेंटीमीटर जाडीचे गोल काप करून पाण्यात घालून ठेवावेत), १ कप रवा, २ टेबलस्पून तिखट, अर्धा टीस्पून हळद, मीठ, पाव कप नारळाचं तेल.
कृती - रव्यात हळद, तिखट आणि चवीनुसार मीठ घालून एकत्र करून घ्या. तवा तापत ठेवा. बटाट्याचा एकेक काप पाण्यातून काढा आणि हातानेच पाणी निथळून नंतर तो रव्याच्या मिश्रणात घोळवा.
तव्यावर मावतील तितके काप असे रव्यात छान घोळवून तव्यावर लावून घ्या. बाजूनं नारळाचं तेल सोडून झाकण ठेवून मध्यम ते मंद आचेवर सर्व काप कुरकुरीत होईपर्यंत भाजा. साधारण ५ मिनिटं लागतात. मग काप उलटून दुसऱ्या बाजूनंही नारळाचं तेल सोडून भाजा. वर रव्याचं कुरकुरीत आवरण आणि आत छान शिजलेला बटाटा असे हे काप गरम गरमच वाढा.
आळसांध्या रांदोइ
साहित्य - २ कप चवळी (धुवून, भिजत घालून ठेवा. चांगली भिजल्यावर कुकरमध्ये २ शिट्ट्या देऊन शिजवा. चवळी शिजायला हवी, पण लगदा व्हायला नको.), अर्धा नारळ (खोवलेला), ७-८ ब्याडगी मिरच्या, १ टेबलस्पून धने, चेरीच्या आकाराएवढी चिंच, १५-२० तिरफळं, मीठ, ४ टेबलस्पून नारळाचं तेल, ५-६ मोठ्या लसूण पाकळ्या (वाटून).
कृती - ओलं खोबरं, धने, लाल मिरच्या आणि चिंच मिक्सरवर बारीक वाटून घ्या. हे वाटण उकडलेल्या चवळीत घाला. थोडं पाणी घालून हवे तितके पातळ करून घ्या. तिरफळं अर्धा कप पाणी घालून मिक्सरवर वाटा आणि त्याचं पाणी गाळून घेऊन ते चवळीत घाला. चवीनुसार मीठ घालून उकळी आणा. शेवटी फोडणीच्या पळीत नारळाचं तेल तापवून त्यात वाटलेला लसूण घाला. लसूण छान तळला जाऊ द्या आणि ही फोडणी चवळीवर घाला. ही आळसांध्या रांदोइ गरमागरम भाताबरोबर वाढा. त्याच्या जोडीला वर दिलेले बटाट्याचे काप आणि डाळीतोंय असेल, तर जेवणाची लज्जत आणखी वाढेल.