>> संजीव साबडे
मुंबईच्या अन्य भागांतील मराठीपण कमी होत गेलं असलं तरी लालबाग व परळमध्ये आजही मराठी चालते आणि मराठीचंच चालतं. मराठी खाद्य संस्कृतीची अस्सल चव चाखायची तर या भागात फेरफटका मारायलाच हवा.
लालबाग व परळ म्हटलं की, गिरणगावची मराठमोळी मुंबई डोळ्यांसमोर येते. तिथे गिरणी कामगारांच्या चाळी जाऊन त्या जागी टॉवर्स आले आहेत. मुंबईच्या अन्य भागांतील मराठीपण कमी होत गेलं असलं तरी लालबाग व परळमध्ये आजही मराठीच चालते आणि अद्याप मराठीचा ठसा जाणवतो. चिंचपोकळी, करी रोड आणि परळ स्टेशनपासून चालत जाण्याच्या अंतरावरचं लालबाग हे सणासुदीच्या खरेदीसाठी जसं प्रसिद्ध आहे तसंच ते खाण्यासाठीही खूप प्रसिद्ध आहे. तिथे अनेक मांसाहारी आणि शाकाहारी मस्त ठिकाणं आहेत.
पहिलं ठिकाण अर्थातच लालबाग सिग्नलपाशी मयुरेश ड्रेसवाल्याच्या समोरच्या बाजूला असलेलं मुंबई लाडू सम्राट. जेव्हा गिरण्या सुरू होत्या आणि कामगारांची वस्ती होती, तेव्हा मारुती राक्षे यांनी महाराष्ट्र लाडू सम्राट सुरू केलं. त्या वेळी त्यांच्याकडील सर्व आणि त्यातही कडक बुंदीचे लाडू लोकप्रिय व स्वस्त होते. कोकणात गणपती, होळी, दिवाळीला जाताना कामगार इथले कडक बुंदी लाडू घेऊन जात. मुंबईतील गणेशोत्सवातही यांच्याकडील लाडू लोकप्रिय ठरले आणि ते झाले मुंबई लाडू सम्राट. या रेस्टॉरंटला दोन वर्षांनी 60 वर्षं पूर्ण होतील. पण आता हे ठिकाण फक्त लाडूसाठी लोकप्रिय नाही तर बटाटेवडा, मिसळ, साबुदाणा वडा, कचोरी, साबुदाणा खिचडी, कोथिंबीर वडी, अळूवडी, खरवस, मसाले भात, राजगिरा पुरी व भाजी, फराळी मिसळ, उपवासाचा डोसा, आमरस पुरी या खासियतसाठी प्रसिद्ध आहे. काहीजण तर केवळ बटाटेवडा खाण्यासाठीच तिथे जातात. तेथील खमंग मिसळ आणि साबुदाणा वडा व खिचडीही लोकांना खूप आवडते आणि अर्थातच सर्व प्रकारच्या लाडूसाठी राक्षे यांचं लाडू सम्राट प्रसिद्ध व लोकप्रिय आहे. कमलाकर राक्षे यांनी लहान मुलं आणि तरुणांना आवडणारे खाद्यपदार्थ लक्षात घेऊन तेही मेन्यूमध्ये आणून बसवले आहेत. जेवण झालं की, मसाला दूध किंवा थंडाई, आंबा लस्सी, पियुष, मसाले ताक वा सोलकढी पिऊन तृप्त व्हायचं.
तिथूनच जवळ आहे मार्तंड मिसळ. हे विविध प्रकारच्या मिसळ आणि मराठी खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध रेस्टॉरंट. याच भागात मार्तंड रेस्टॉरंटही आहे. पण ते मांसाहारी. शाकाहार करायचा की मांसाहार हे मनाशी ठरवून ठिकाणं नक्की करायचं. ही दोन्ही ठिकाणं समोरासमोर, पण त्यांचा एकमेकांशी संबंध नाही. मार्तंड मिसळची फक्त एकच शाखा दादरमध्ये आहे. या मार्तंडमध्ये मिसळीचे किमान 12 प्रकार आहेत. अगदी चीज व जैन मिसळही आहे. मस्त कांदा, कोथिंबीर घातलेली आणि शेजारी लिंबू ठेवलेली नेहमीची झणझणीत मिसळ सर्वात मस्त. पण कुठेही मिसळ खाताना वेगळे प्रयोग टाळणं उत्तम. मार्तंडमध्ये मिसळीशिवाय थालीपीठ, बटाटेवडा, कोथिंबीर वडी आणि पुरणपोळी असेही अनेक मराठी माणसाला आवडतील, असे खाद्यपदार्थ मिळतात.
चिंचपोकळी स्टेशनहून पूर्वेकडे उतरलात की, येते गणेश गल्ली. तिथून जवळच डॉ. आंबेडकर रोडवर मिसळ आणि उसळ यासाठीचं गिरणगावातील कामगारांचं एक आवडतं ठिकाण आहे. ते म्हणजे न्यू आनंद भवन रेस्टॉरंट. तिथे मिसळ पावाबरोबरच उसळ पाव खाणारेही खूप दिसतात. उसळ खमंग असेल तर ती पावाबरोबर खातानाही मजा येते. पूर्वी गिरणगावात वडापाव आणि बटाटेवडा व उसळ म्हणजेच उसळ वडा हा लोकप्रिय होती. वेटरला
ऑर्डर दिली की, तो किचनकडे तोंड वाळवून ‘एक सिंगल वडा उसल मार के’ असं ओरडायचा. स्टोव्हवर रटरटणारी शक्यतो पांढऱया वाटाण्याची गरम उसळ असली की, मग त्यातील बटाटेवडा गरम वा गार कसाही चालतो. सोबतीला दोन पाव. मिसळपेक्षा ही डिश पूर्वीही स्वस्त आणि पोटभरीची असायची. आताही मिळते. शिवाय वडा चटणी, वडापाव आणि इथली खासियत म्हणजे कुरकुरीत कांदा भजी. मुंबईकर त्याला खेकडा भजी म्हणतात. ती इथे नक्कीच खावी. इथेही साबुदाणा वडा, कोथिंबीर वडी असते. ती नक्की खाच, पण इथलं नारळाचं वा नाचणीचं पुडींग खायला विसरू नका.
मार्तंड मिसळच्या जवळच ‘आय लव मिसळ’ नावाचं एक रेस्टॉरंट आहे. नावावरून ते मिसळसाठी प्रसिद्ध असणार हे कळतंच. पुणे, कोल्हापुरी वा अगदी नाशिकची मिसळ सर्वांना माहीत असते, पण कधी न ऐकलेली मालवणी मिसळ इथे मिळते. मालवणी मिसळ खरं तर काळ्या वाटाण्याची आणि मालवणी मसाला घातलेली उसळ असेल तरच अस्सल. तशा मिसळीच्या उसळीत नारळाचं वाटणही हवं. हल्ली बऱयाच ठिकाणी मिसळीची थाळीच देतात. म्हणजे पोटभर जेवणच. त्यात पेलाभर ताक आणि एखादा गोड पदार्थ. अशी गुलाबजाम मिसळ थाळी इथे आहे. याशिवाय वडा, कोथिंबीर, साबुदाणा वडा आणि खिचडी, फराळी मिसळ वडी वगैरे मराठमोळे प्रकार आहेतच, पण भाजणीचं थालीपीठ, झुणका भाकर, पिठलं भात आणि गुळाचा खरवसही या ‘आय लव मिसळ’मध्ये मिळतो. गिरणगावात मराठमोळी मांसाहारी ठिकाणंही खूप आहेत. त्यांच्याबद्दल नंतर कधीतरी.