सातपूर- कोट्यवधींच्या ‘सुपारी’ प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे खबरीच लुटारू निघाल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने पोलिस यंत्रणा आता खबरी, तसेच मुंबईतील ‘एफडीए’चे वरिष्ठ अधिकारी यांच्यातील संभाषणाची माहिती घेत आहेत. यामुळे कोट्यवधीच्या ‘सुपारी’ प्रकरणाचा मुख्य आका व त्याच्या पंटरांचे धाबे दणाणले आहे. दुसरीकडे हा मुख्य सूत्रधार अडकू नये म्हणून तपास यंत्रणांवर राजकीय दबाव आणण्याच्या हालचाली केल्या जात असल्याचे सूत्रांकडून समजते.
अन्न व औषध प्रशासनातील मंत्रालयात मंत्रिमहोदयाचे ‘पीएसओ’ व ‘एसडीओ’ यांनी नाशिकच्या अधिकाऱ्यांना सुपारी प्रकरणाची फाईल घेत शनिवारी (ता. १७) मुंबईत बोलावले होते; पण सायंकाळपर्यत त्यांना बसूनच ठेवले. या बैठकीत अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी मात्र पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यावर या बैठकीपासून स्वतःला दूर ठेवले. दुसरीकडे तपास यंत्रणा या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून असल्याचे लक्षात आल्याने कागदपत्रांची फेरफार करण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिल्याचे सूत्रांकडून समजते.
कधीकाळी राज्यातील अन्न व औषध प्रशासनाबाबत कमालीची धास्ती होती. मुबलक अधिकारी, कर्मचारी व त्याला पूरक यंत्रणांमुळे सर्वसामान्यांच्या जीवनावश्यक, दैनंदिन गरजा, अन्न व औषध भेसळ तपासणीची स्वतःची लॅब, तसेच इतर यंत्रणांमुळे भेसळ करणारे व बेकायदेशीर गोष्टींवर आळा घातल्याची अनेक उदाहरणे आहेत. या खात्याचे तत्कालीन आयुक्त महेश झगडे यांनी या खात्याचे महत्त्व वाढविले होते; पण नंतरच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. नमुने तपासणीचे काम खासगी, राजकीय नेत्यांशी संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्याने हे ठेकेदार अर्थकारणामुळे पाहिजे तो अहवाल करून देत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तपासणी आणि कारवाई अहवाल हातात हात घालून चालत आहेत.
नाशिकमधील कोट्यवधीच्या सुपारी प्रकरणी ‘एफडीए’ची कारवाई व त्यानंतर खबरींनी मंत्रालय स्तरावरून आदेश मिळताच बेकायदेशीरपणे केलेला प्रताप आता अंगलट आला आहे. दुसरीकडे गुन्हा दाखल झाल्यावर तपास यंत्रणांनी तीन संशयितांना अटक केल्यावर महिनाभरापासून हे तिन्ही अन्न व औषध प्रशासनाच्या मंत्रालय स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्कात होते का, याचीही सीडीआर तपासणी केली जात असल्याचे समजते.
नाशिक, पुणे व छत्रपती संभाजीनगरमध्ये एका चहाच्या कंपनीच्या नमुने तपासणीत शरीराला घातक केमिकलचा प्रकार समोर आला. यानंतर छापामारी करण्यात आली होती. काही गुदामे ‘सील’ करण्याची कारवाई दाखविण्यात आली. प्रत्यक्षात मात्र या कंपनीने मंत्रालयात ठाण मांडून आपला माल मार्केटमधून विकून कार्यभाग साधला. यासाठी ही समांतर यंत्रणेचा हात असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली आहे.