शेअर बाजारातील तेजीमुळं रिलायन्स इंडस्ट्रीजचे गुंतवणूकदार मालामाल, 5 दिवसात 1 लाख कोटींची कमाई
Marathi May 18, 2025 11:25 PM

मुंबई : भारतीय शेअर बाजारात 12 ते 16 मे दरम्यान जोरदार तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जोरदार वाढ झाली. निफ्टी 50 नं 25 हजारांचा टप्पा पार केला. तर सेन्सेक्सनं देखील 82 हजारांचा टप्पा ओलांडला. सेन्सेक्सवरील टॉप-10 कंपन्यांपैकी 9 कंपन्यांच्या गुंतवणूकदारांच्या संपत्ती मोठी वाढ झाली. या कंपन्यांचं बाजारमूल्य संयुक्तपणे 3.35 लाख कोटी रुपयांनी वाढली. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजारमूल्यात पाच दिवसात 1 लाख कोटींची वाढ झाली. यामुळं गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये देखील वाढ झाली.टीसीएस आणि एचडीएफसीचे शेअर देखील वधारले.

रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल

शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली तेव्हा रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. रिलायन्सचं बाजारमूल्य 19.72 लाख कोटींवर पोहोचलं आहे. म्हणजेच रिलायन्स इंडस्ट्रीजच्या गुंतवणूकदारांनी केवळ पाच दिवसात 1.06 लाख कोटींची कमाई केली.

रिलायन्स इंडस्ट्रीज शिवाय आयसीआयसीआय बँकेचं बाजारमूल्य 46,306.99 कोटी रुपयांनी वाढून 10.36 लाख कोटींवर पोहोचलं.  टाटा ग्रुपच्या टीसीएसचं बाजारमूल्य 43,688.4 कोटी रुपयांनी वाढून ते 12.89 लाख कोटींवर पोहोचलं.  इन्फोसिसच्या बाजारमूल्यात  34,281.79 कोटी रुपयांची वाढ होऊन ते 6.60 लाख कोटींवर पोहोचलं.

HDFC Bank बँकेच्या बाजारमूल्यात  34,029.11 कोटी रुपयांची वाढ झाली अन् ते 14.80 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं. टॉप टेन कंपन्यांच्या यादीत एचडीएफसी बँक दुसऱ्या स्थानावर आहे.  बजाज फायनान्सचं बाजारमूल्य 32,730.72 कोटींनी वाढून 5.69 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं. आयटीसीचं बाजारमूल्य 15,142.09 कोटींनी वाढून  5.45 लाख कोटी झालं.  स्टेट बँक ऑफ इंडियाचं बाजारमूल्य 11,111.15 कोटी रुपयांनी वाढून 7.06 लाख  कोटी झालं. हिंदूस्तान युनिलिव्हरचं मार्केटकॅप  11,054.83 कोटी रुपयांच्या वाढीसह 5.59 लाख कोटींवर पोहोचलं.

एअरटेलचं बाजारमूल्य मात्र घटलं. भारती एअरटेलचं बाजारमूल्य 19330.14 कोटी रुपयांनी घसरुन 10.34 लाख कोटी झालं.  सेन्सेक्स 12 मे ते 16 मे दरम्यान 2876.12 अंकांनी वाढला. सेन्सेक्समधील टॉप 30 कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी सौदी अरेबियात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट देखील घेतली होती. रिलायन्स इंडस्ट्रीज बाजारमूल्याच्या आधारे देशातील पहिली कंपनी आहे. त्यानंतर  एचडीएफसी बँक, टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस , आयसीआयसीआय बँक , भारती एअरटेल, स्टेट बँक ऑफ इंडिया, इन्फोसिस, बजाज फायनान्स, एचयूएल, आईटीसी असा क्रम आहे.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेदेखील वाचा

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.