पंचवीस वर्षांनी भरला दहावीचा वर्ग
esakal May 19, 2025 12:45 AM

64612

पंचवीस वर्षांनी भरला दहावीचा वर्ग

भेडशी न्यू इंग्लिश स्कूलच्या १९९९-२००० बॅचचा स्नेहमेळावा

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १८ ः आयुष्याच्या वर्गात शिक्षणाची शाळा ज्यावेळी भरते, त्यावेळचा मित्र-मैत्रिणींचा सहवास आणि शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यात दडलेल्या आठवणी, हे आपल्या आनंदी जगण्याचे रसायन असते. विद्येबरोबरच आठवणी आणि संस्कारांचे दप्तर घेऊन आपण बाहेर पडतो, प्रत्येक सवंगडी आपापल्या मार्गांनी मार्गस्थ होतात. पंचवीस वर्षांचा काळ लोटतो आणि अचानक याच मित्र-मैत्रिणींची पुन्हा एकदा शाळा भरते. तो क्षण रम्य आणि सुवर्ण अक्षरांनी रेखाटण्याचा असेल. न्यू इंग्लिश स्कूल भेडशीच्या १९९९-२००० ची दहावीची बॅच तब्बल २५ वर्षांनी एकत्र आली आणि बालपणातील आठवणींच्या हिंदोळ्यावर प्रत्येक विद्यार्थी झुलत गेला. निमित्त होते मित्र-मैत्रिणींच्या ‘गेट-टुगेदर’चे.
चंदू रॉयल प्लाम फार्म दोडामार्ग येथे हा स्नेहमेळावा नुकताच झाला. प्रत्येक जण समोरासमोर आल्यानंतर हृदयातील आठवणींची कवाडे खुली झाली. त्या रम्य आठवणींचे अश्रू प्रत्येकाच्या डोळ्यात तरळत होते. यावेळी आयोजित विविध उपक्रम पुन्हा एकदा त्या आठवणींच्या दप्तरात बंदिस्त झाले. रामू खरवत यांनी विनोदी शैलीत सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य उमटविले. महादेव डांगी यांनी प्रत्येकाच्या शालेय जीवनातील क्षण पुन्हा पुनर्जीवित केले. संदीप देसाई यांनी गायलेली शायरी, कवी सतीश धर्णे व राजाराम भट यांनी स्नेहभेट दिलेल्या कविता आणि नीलेश दळवी याने सर्व मित्रांना दिलेले आपुलकीचे गिफ्ट सारे काही भारावणारे होते. यावेळी शरीर जरी वर्तमानात असले, तरी मन मात्र शालेय जीवनात रमले होते. प्रत्येक जण प्रत्येकाची आस्थेने विचारपूस करत होता. संदीप देसाई, सतीश धरणे यांच्यासह बऱ्याच सहकाऱ्यांनी या स्नेहमेळाव्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल सर्वांनीच विशेष कौतुक केले. संदीप देसाई, सतीश धर्णे, संदीप अ. देसाई, अजित देसाई, नारायण दळवी, प्रवीण नाईक, अजित गवस, मनोज पवार, बाळा सावंत, बाळा ठाकूर, रेश्मा देसाई, आरती बोंद्रे, गंगा धर्णे, सुवर्णा पारधी, तुकाराम नाईक, रजनीश गवस, विजय गवस, नारायण नाईक, दीपा धर्णे, मनोज बोंद्रे, दिलीप दळवी, राजाराम भट, सचिन गवस, अजित नाईक, महेश सुतार, ज्योती नाईक, सुरेखा नाईक, प्रशांत कदम, प्रतिभा सावंत, रामचंद्र खरवत, संतोष तांबे, मीना धुरी, सुमन दळवी, मेघा दळवी, कविता परब, नीलेश वझरेकर, ज्योत्स्ना धर्णे, समीर वझरेकर, महादेव डांगी हे सारे संवगडी या आनंद मेळाव्याचे साक्षीदार झाले. पुन्हा एकदा २०२६ च्या गेट टूगेदरचा संकल्प सोडून साऱ्या वर्गमित्र-मैत्रिणींनी निरोप घेतला.
---------
माजी सैनिकांचा सत्कार अभिमानास्पद
संगीत खुर्ची, लिंबू चमचा, फुगे घेऊन चालणे, सर्वांत जलद स्ट्रॉ केसामध्ये माळणे यांसह एकत्र केक कापणे याचा साऱ्या बॅचमेंटनी पुरेपूर आनंद लुटला. तत्पूर्वी याच बॅचमधील सैन्यदलात सेवा बजावून निवृत्त झालेले माजी सैनिक अजित नाईक व विजय गवस यांचा सत्कार करताना सवंगड्यांचा उर अभिमानाने भरून आला. खानयाळे येथील नारायण नाईक याने सादर केलेले अप्रतिम गीत, ज्योत्स्ना धरणे हिने शाळेतील त्यावेळची काही ऐकवलेली गाणी, प्रवीण नाईक याने नटसम्राट नाटकातील आप्पासाहेब बेलवलकर यांची सादर केलेली भूमिका यादगार ठरली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.